|Thursday, September 19, 2019
You are here: Home » विविधा » ‘मौज’ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक

‘मौज’ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक 

 पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (2017) निकाल जाहीर करण्यात आला असून, अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी ‘मौज’ या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे.

चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘ललित’ला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘समदा’स, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘साहित्य शिवार’ला, त्याचबरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘अक्षरनामा’ या दिवाळी अंकाला देण्यात येईल. ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘मनशक्ती’ या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘अक्षर’ या दिवाळी अंकातील विजय खाडिलकर यांच्या ‘आवर्त’ या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘शब्दशिवार’ या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला’ या लेखाला जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धेचे निमंत्रक आणि ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी दिली. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 188 दिवाळी अंक आले होते.  परीक्षक म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर, विनया देसाई, प्रभा सोनवणे यांनी आणि ऑनलाईन दिवाळी अंकासाठी प्रतिक पुरी यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी सायंकाळी 6.30 ला मसापमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे.