|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » चीनचा खोडसाळपणा कायम

चीनचा खोडसाळपणा कायम 

डोकलाम स्वतःचा भूभाग असल्याचे केले विधान : विकासकामे सुरू असल्याचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डोकलाम आमचाच हिस्सा असून तेथे विकासकामे सुरू असल्याचे विधान चीनने केले आहे. भारत तसेच चीनने डोकलामसमवेत पूर्ण सीमा विवाद शांतता तसेच चर्चेने सोडवावा, असेही चिनी अधिकाऱयाने म्हटले. मागील वर्षी 16 जून रोजी दोन्ही देशांदरम्यान डोकलाम वाद झाला होता. तेव्हा दोन्ही देशांचे सैन्य 100 मीटरच्या अंतरावर परस्परांच्यासमोर उभे ठाकले होते. 28 ऑगस्ट रोजी 73 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱयाअगोदर वादावर तोडगा काढण्यास यश आले होते.

चीनमधील भारतीय राजदूत गौतम बंबावले यांनी अलिकडेच तेथील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सला मुलाखत दिली होती. 3448 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेवर संवेदनशील ठिकाणांवर जैसे थे स्थिती कायम ठेवली जावी असे बंबावले यांनी म्हटले होते. दोन्ही देशांदरम्यान जो तणाव आहे, तो एका व्यवस्थेद्वारेच शांततेने निकालात काढला जावा. याकरता वातावरणाची निर्मिती करावी लागणार असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

भूतान स्वतःचा दावा मांडणारा डोकलाम आमचा भूभाग आहे. तेथे आम्ही विकासकामे करत आहोत. डोकलामच्या मुद्यावर चीनची भूमिका ठाम आहे. डोंगलांग (डोकलाम) समवेत सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये नेहमीच चीनचे सार्वभौमत्व राहिले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये डोकलाममधील विकासावरून बातम्या दिल्या जातात. त्यांनाच तेथील स्थितीची अधिक चिंता असल्याची टिप्पणी चुनयिंग यांनी केली. 1890 मध्ये झालेल्या चीन-युनायटेड किंग्डम कराराचा दाखला देत चुनयिंग यांनी ऐतिहासिक करारामुळेच भारत-चीन सीमेवरील सिक्कीम सेक्टरला वेगळे करण्यात आले होते आणि ती बाब चीन मान्य करत असल्याचे सांगितले.

Related posts: