|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » मतभेद असणार्‍यांना जगूच द्यायचे नाही, अशी आजची परिस्थिती: निखील वागळे

मतभेद असणार्‍यांना जगूच द्यायचे नाही, अशी आजची परिस्थिती: निखील वागळे 

प्रेम, बंधुता, अहिंसा, शांतता, समतेनेच सामाजिक सलोखा निर्माण होईल 
 
ऑनलाईन टीम / पुणे 
       
 आज समाजात प्रेम कमी आणि हिंसा मोठ्या प्रमाणात आहे. मतभेद असणार्‍यांना जगूच द्यायचे नाही, अशा परिस्थितीमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. फुले-शाहू-आंबेडकर, महात्मा गांधी यांचे प्रेम, बंधुता, अहिंसा, शांतता, आर्थिक-सामाजिक समतेवर आधारित विचार आचरणात आणले, तरच समाजात सलोखा निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केले. 
इंद्रायणी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाले’चे दुसरे पुष्प गुंफताना ‘सामाजिक सलोखा आणि आजचे समाज वास्तव’ याविषयावर निखील वागळे बोलत होते. महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राजश्री म्हस्के, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, व्याख्यानमालेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे आदी मान्यवर उपस्थित होते.
          निखील वागळे म्हणाले, सामाजिक सलोख्याची आस मनात असावी लागते. ती अचानक निर्माण होत नाही. आज जातीव्यवस्था बळकट होत चालल्यामुळे समाजात अस्थिरता येऊ लागली आहे. धार्मिक कारणावरून दंगली घडण्याचा शाप 1872 पासून महाराष्ट्राला आहे, तो अद्याप आहे. दंगलीची कारणे माहीत असूनही, अद्याप दंगली होतच आहेत. स्वातंत्र्यानंतर नथुराम गोडसे या माथेफिरुने महात्मा गांधी यांचा खून केला. स्वातंत्र्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवणारी ही पहिली घटना होती. गांधीजींमुळे फाळणी झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण गांधीजींचा फाळणीला विरोधच होता. नथुराम ब्राह्मण होता, म्हणून गांधीजींच्या खूनानंतर ब्राह्मणांना लक्ष्य करणेही चुकीचे होते. नथुराम ब्राह्मण नाही, तर ‘माणूस’च नव्हता. तो धर्मांध अतिरेकी होता. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीचे समर्थन करणे चुकीचे आहे. महात्मा गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदू मानायचे. सनातन हिंदू धर्म ऋग्वेदावर आधारित असून, त्याचा पाया सर्वधर्म समानतेचा आहे. आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक विकास ही सनातनची धर्मकल्पना आहे. 

Related posts: