|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फ्रान्स : 108 वर्षातील सर्वात मोठा पूर

फ्रान्स : 108 वर्षातील सर्वात मोठा पूर 

240 शहरांना फटका : सीन नदी धोक्याच्या पातळीवर : 1500 जणांना वाचविले

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्समध्ये पावसाने मोठे नुकसान घडविले असून राजधानी पॅरिसमधून वाहणारी सीन नदीची पाणीपातळी 20 फुटांनी वाढली आहे. हे प्रमाण सामन्य स्थितीपेक्षा 13 फूटांनी अधिक असून 1910 नंतर सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. 1910 मध्ये या नदीची पाणीपातळी 28 फूटांनी वाढली होती. पावसामुळे पॅरिस तसेच नजीकच्या 240 शहरांमध्ये पूर आला आहे.

पॅरिसमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय. येथे घरांमध्ये अडकून पडलेल्या 1500 पेक्षा अधिक जणांना वाचविण्यात आले. जानेवारीच्या पहिल्या 28 दिवसांमध्ये 168 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हे प्रमाण जानेवारीमध्ये होणाऱया सरासरी पावसापेक्षा दोनपटीने अधिक आहे. प्रसिद्ध लोवर संग्रहालयात देखील पाणी शिरले आहे.

7 रेल्वेस्थानके बंद

पूरामुळे शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद करावी लागली आहेत. रुग्णालयांमधून रुग्णांना बाहेर काढले जातेय. पॅरिसच्या 11 भागांमध्ये नारिंगी रंगाचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा धोक्याच्या 4 वर्गवारीपैकी तिसऱया क्रमांकाचा आहे. शहराची 7 सर्वात व्यस्त रेल्वेस्थानके बंद करण्यात आली आहेत.

20 वर्षांमध्ये 9व्यांदा पूर

हवामान खात्यानुसार पॅरिसमध्ये मागील 20 वर्षांमध्ये 9 व्यांदा पूर आला आहे.  सध्या आलेला पूर यात सर्वाधिक भीषण आहे. रस्त्यांवर नौका चालवून लोकांना वाचविले जात आहे. एक आठवडय़ात पुराचे पाणी ओसरण्याची अपेक्षा
आहे.

पुतळय़ाद्वारे मोजतात पाणीपातळी

सीन नदीची पाणीपातळी तेथे उभारण्यात आलेला प्रेंच सैनिक द जोवेव यांच्या पुतळय़ाच्या माध्यमातून मोजली जाते. सध्या या पुतळय़ाच्या कंबरेइतपत पाणी आले आहे. 1910 मध्ये पुतळय़ाच्या नाकापर्यंत पाणी पोहोचले होते.