|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संतकवी सोहिरोबानाथांच्या साहित्याचा प्रसार व्हावा!

संतकवी सोहिरोबानाथांच्या साहित्याचा प्रसार व्हावा! 

ज्यांनी अध्यात्माची कवाडे साऱया जगाला उघडून दिली, असे गोव्याचे थोर संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांची 304 वी जयंती बावाखानवाडा-पालये, पेडणे गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी आज साजरी होत आहे. अशा या संतांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने गोमंतकियांनी पावले उचलणे गरजेचे ठरते.

 

ज्याप्रमाणे संत तुकारामांमुळे देहू, संत ज्ञानेश्वरांमुळे आळंदीला महत्त्व प्राप्त झाले, त्याचप्रमाणे संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्यामुळे केवळ पालये गावालाच नव्हे तर संपूर्ण गोव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे जणू संतकवी सोहिरोबानाथ तमाम गोमंतकीयांचे भूषण मानले जातात.  दरवर्षी या संतांची जयंती गुरुप्रतिपदेला साजरी करण्यात येते. यासाठी पालये येथील आयडियल इंग्लिश हायस्कूल पुढाकार घेते. यंदाही आयडियल हायस्कूलने यासाठी पुढाकार घेतला असून या हायस्कूलतर्फे पेडणे तालुकास्तरीय इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा विषय ‘युवापिढी चंगळवादाच्या भोवऱयात’ असा ठेवण्यात आलेला आहे. या उपक्रमासाठी खरोखरच आयडियल हायस्कूलला धन्यवाद द्यावे लागतील.

संत सोहिरोबानाथांच्या जन्मस्थळाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी होत होती परंतु पर्यटनस्थळांची आज गोव्यात काय परिस्थिती आहे, हे गोमंतकीय अनुभवत आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळाऐवजी तीर्थस्थळ बनविण्यासाठी गोवा सरकारने पुढाकार घेणे आवश्यक ठरत आहे. अनेक गोमंतकीय लेखकांनी संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्यावर साहित्य संपदा रचली आहे. हल्लीच ज्येष्ठ पत्रकार रमेश वंसकर यांचेही ‘संतश्रेष्ठ सोहिरोबानाथ आंबिये’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय अनेक गोमंतकीय लेखकांनी सोहिरोबानाथ आंबिये यांच्यावर नाटक लिहिले असून सोहिरोबानाथांच्या अभंगाच्या सीडीही प्रकाशित झाल्या आहेत. आजच्या काळात संतसाहित्य सर्वांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. ती काळाची गरज ठरते.

पेडणेच्या साहित्य परंपरेचा विचार करायचा झाल्यास सुरुवात संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्यापासून करावी लागेल. पेडणे तालुक्यातील बावाखानवाडा-पालये येथे 1714 साली त्यांचा जन्म झाला. ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ असा संदेश देणाऱया सोहिरोबानाथांनी अभंग, पदे, श्लोक, कटिबंध, सवाया, आरती अशा स्फूटकविता रचल्या. सुमारे पाच हजार ओवी संख्या असलेला त्यांचा ‘सिद्धांतसंहिता’ हा मराठी ओवीबद्ध गंथ आहे. त्यांचा ‘अक्षयबोध’ नावाचा आठ अध्यायांचा ग्रंथ आजच्या युगातही प्रेरणादायी आहे. ‘महद्नुभवेश्वरी’ हा ज्ञानेश्वरीइतका नऊ हजार ओव्यांचा ग्रंथ असून त्याची तुलना देखील ज्ञानेश्वरीशी आपण करू शकतो. शिवाय ‘पूर्णाक्षरी’, ‘अद्वयानंद’ हेही ग्रंथ त्यांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे आहेत. भक्ती, ज्ञान, वैराग्यपर असे हे ग्रंथपंचक मराठी साहित्यासाठी भूषणावह ठरणारे आहे.

सुप्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर यांनी ‘कोकणचा ज्ञानेश्वर’ म्हणून संत सोहिरोबानाथ यांचा उल्लेख केला आहे. सोहिरोबांचा ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे’ हा अभंग सुप्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध संगीतकार कै. दशरथ पुजारी, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी या अभंगाला अजरामर करून ठेवले आहे. संत सोहिरोबानाथांच्या प्रत्येक अभंगात ‘रे’ हा शब्द आढळतो. यामुळे अभंगाद्वारे उपदेश सांगण्यामागे त्यांची तळमळ, आर्तता दिसून येते.  संत सोहिरोबानाथ आंबिये यांची पालये गावातील वास्तू अजूनही संतांच्या वास्तव्याची जाणीव करून देते. य्या वास्तूच्या ठिकाणी संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचा पुतळा उभारणे आवश्यक आहे. तसेच त्यांची ग्रंथसंपदाही याठिकाणी उपलब्ध करणे आवश्यक ठरते. चित्रांच्या माध्यमातूनही त्यांचे चरित्रही याठिकाणी रेखाटणे कुणा चित्रकारांना सहज शक्य आहे. त्यादृष्टीनेही प्रयत्न होणे आवश्यक ठरते. 2008 साली गोवा सरकारने या परिसराचे सुशोभीकरण केले. वास्तूच्या परिसरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखालच्या परिसराचेही सौंदर्यीकरण करून गोवा सरकारने या वास्तूला नवे स्वरुप दिले होते. या वास्तूला कुठलेही गालबोट न लावता या वास्तूचे जतन करणे आवश्यक ठरते.  संत सोहिरोबानाथांचे सहावे वंशज डॉ. रामकृष्ण आंबिये हे मुंबईत स्थायिक असले तरी सोहिरोबानाथांच्या जयंतीदिनी त्यांचे बंधू, मुंबईतील सहकारीवर्ग उत्सवाला आवर्जून उपस्थिती लावतात. एरव्ही सणासुदीला त्यांचे या ठिकाणी येणे होते. सोहिरोबानाथांची जयंती गुरुप्रतिपदेला होत असली तरी त्यांची नेमकी जन्मतारीख अजून सापडलेली नाही. संशोधकांनी ती शोधून काढणे कर्तव्य ठरेल.

सोहिरोबानाथांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तही याठिकाणी कार्यक्रम घडवून आणला गेला. गोवा सरकारमार्फतही राज्यस्तरीय कार्यक्रम झाला. विर्नोडा येथील सरकारी महाविद्यालयाला संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे नाव देण्यात आले आहे. गोवा विद्यापीठातही खास अध्यासन सुरू करण्यात आले आहे. बांबोळी येथील रस्त्यालाही त्यांचे नाव देण्यात आले. एकंदरित सोहिरोबांचा सरकारकडून उचित गौरव झालेला आहे. सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार झालेल्या इन्सुली-बांदा, सिंधुदुर्ग याठिकाणी त्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. गोवा म्हटले म्हणजे जणू ‘खा, प्या, मजा करा’ अशी ओळख. गोव्याला लाभलेली समुद्रकिनारी संस्कृती यामुळे संगीत रजनी, पाटर्य़ांचा सुकाळ, अमलीपदार्थ व्यवसाय, मद्यालये आदी बाबींमुळे ही ओळख निर्माण होणे साहजिकच आहे. किनारी संस्कृतीमुळे गोव्याचे बदनाम झालेले नाव आज सुधारण्याची गरज आहे. गोवा ही भोगभूमी नसून ती संतभूमी, योगभूमी आहे, हे आज साऱया जगाला पटवून देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी संत साहित्याचा प्रचार, प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. गोव्यातील अन्य विद्यालयांनीही संतांचे कार्य तसेच त्यांचे साहित्य विषयक विविध उपक्रम राबवून गोमंतकीय संस्कृतीपासून दूर जात असलेल्या, वाममार्गाकडे वळणाऱया विद्यार्थ्याला सन्मार्गाची दिशा देण्याचे कार्य बजावावे, असे नम्रपणे सूचवावेसे वाटते.

Related posts: