|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » राजस्थानात काँग्रेस तेजीत; भाजपा ‘तुटी’त

राजस्थानात काँग्रेस तेजीत; भाजपा ‘तुटी’त 

ऑनलाईन टीम  / जयपूर

   केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे एकीकडे मोदी सरकारचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर करत असतानाच दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाचा सुपडा साफ केला. लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने भाजपाचा विजयाचा संकल्प व्यर्थ ठरला आहे. राजस्थान विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या  निवडणुकीतच पीछेहाट झाल्याने भाजपाकरिता हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अर्थशास्त्रीय परिभाषेत काँग्रेस तेजीत, भाजपा तुटीत असे या निकालाचे वर्णक केले जात आहे.

   राजस्थानमधील अलवर आणि अजमेर या लोकसभेच्या दोन जागा, तर मांडलगढ या विधानसभेच्या जागेसाठी 29 जानेवारीला मतदान झाले. अजमेरमधील भाजप खासदार सांवरलाल जाट, अलवरचे भाजप खासदार चांद नाथ आणि मांडलगढमधील भाजप आमदार कीर्ति कुमारी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मतमोजणीत सुरुवातीपासून काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. मांडलगढ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला. या निवडणुकीत काँग्रेसच्या विवेक धाकड यांनी भाजपाच्या शक्ती सिंह यांचा 12 हजार 974 इतक्या दणदणीत मतांनी पराभव केला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शक्ती सिंह आघाडीवर होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात त्यांची पीछेहाट होत गेली. अखेर धाकड यांनी शक्ती सिंह यांच्यावर मात केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

   अजमेर व अलवर लोकसभा मतदारसंघातही भाजपाची पीछेहाट झाल्याचे दिसत आहे. अलवरमध्ये काँग्रेसच्या करण सिंह यादव यांनी भाजपच्या जसवंत सिंह यांचा 1 लाख 56 हजार 319 मतांनी पराभव केला. तर अजमेरमध्ये काँग्रेसच्या रघू शर्मा यांनी बाजी मारली. या तिन्ही जागांवर काँग्रेसला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. रस्त्य्यावर उतरून काँग्रेस कार्यकर्ते विजयोत्सव साजरा केला.

वसुंधराराजें विरोधात कौल : सचिन पायलट

   माजी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांनी या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.  त्यांच्या रणनीतीला यश आल्याने मुख्यमंत्री वसुंधराराजेंना मोठा झटका बसला आहे. वसुंधराराजेंविरोधात राजस्थानातील जनतेने कौल दिल्याची प्रतिक्रिया पायलट यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

चाचणी परीक्षेत भाजपा अपयशी

   ही निवडणूक म्हणजे विधानसभेची चाचणी मानली जात होती. मात्र, लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही पोटनिवडणुकांत भाजपा अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपापुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

संख्याबळही घटले

   या पराभवामुळे भाजपाचे संख्याबळही घटले आहे. लोकसभेत भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. नाना पटोले यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने पक्षाचे बळ घटले होते. आता दोघांच्या पराभवामुळे भाजपाच्या संख्याबळात तीनने घट झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या संख्याबळात वाढ झाली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. या विजयाने पक्षामध्ये उत्साह संचारल्याचे दिसत आहे.

विधानसभेत कस लागणार

   या निवडणुकीतील पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा कस लागणार आहे. मोदी सरकारची लोकप्रियता मागच्या काही दिवसांत घसरत चालल्याचे पाहायला मिळाले होते. गुजरात निवडणुकीत भाजपा काठावर पास झाला. त्या पाठोपाठ राजस्थाननेही पोटनिवडणुकीतून झटका दिल्याने भाजपापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. याशिवाय प. बंगालच्या पोटनिवडणुकीतही तृणमूलपुढे भाजपाची पीछेहाट झाली आहे.

 

 

Related posts: