|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विनाकारण हॉर्न वाजविल्यास परवाना रद्द

विनाकारण हॉर्न वाजविल्यास परवाना रद्द 

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून ‘नो हॉर्न प्लीज’मोहीम

मुंबई / प्रतिनिधी

शहरात दिवसेंदिवस खासगी वाहनांच्या संख्येत वाढ होत असताना, या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने ‘नो हॉर्न प्लीज’ची एक मोहीम सुरु केली आहे. यामध्ये परिवहन विभागाने विनाकारण हॉर्न वाजविणाऱया वाहन चालकांचे लायसन्स 15 दिवसांसाठी आणि त्यांचा वाहन रजिस्ट्रेशनचा परवाना तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर चालकाला आर्थिक दंड देखील करण्यात येणार आहे.

वाढत्या वाहतुकीमुळे परिवहन विभागाने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नो हॉर्न प्लीज अशी एक मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत परिवहन विभागाने शहरात झालेल्या मॅरेथॉनमध्ये देखील सहभाग घेऊन हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करु नका, असा संदेश दिला होता. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांना 87 डेसिबल ध्वनीची मर्यादा असते. त्यामध्ये 74 डेसिबल ध्वनी हा इंजिनचा आणि 13 डेसिबल ध्वनी हा हॉर्नचा असावा, असा नियम आहे. परंतु अनेक वाहन चालक या नियमाचे उल्लंघन करताना सर्रास दिसून येतात. 110 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण वाहनांच्या हॉर्नमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर मोहीम पुन्हा मंगळवारपासुन सुरु करण्यात आलेली आहे. या मोहिमेच्या 10 दिवसानंतर मात्र कडक कारवाई करण्यास सुरुवात केली जाणार आहे. याअंतर्गत रस्त्यावर ध्वनी प्रदूषण मोजण्याचे ध्वनी मापक यंत्र घेऊन हॉर्न वाजविणाऱयांवर सदर अधिकारी कारवाई करणार आहेत. या कारवाईत सतत हॉर्न वाजविणाऱया रिक्षा-टॅक्सी आणि इतर वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच काही खासगी वाहनांचे हॉर्न हे फार विचित्र आवाज काढणारे तसेच अती कर्णकर्कश असतात. अशा हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे अशा वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्यात येणार आहे.

Related posts: