|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात तीन अपघातात एक ठार, सहा जखमी

चिपळुणात तीन अपघातात एक ठार, सहा जखमी 

मृत वृद्ध चालक मुंबईतील,

वाहनांचेही नुकसान

 

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावर दुकानखोरी, कराड मार्गावर शहरातील नाथ पै चौक व गजमलपिंपळी येथे दोन दिवसांत झालेल्या तीन विविध अपघातात एक ठार, तर सहाजण जखमी झाले. टेम्पोचालक दिलीपकुमार विठ्ठलकुमार पटेल (66, कांदिवली-मुंबई) यांचा या अपघातात मृत्यू झाला.

या अपघातांमध्ये रामपाल यादव (39), बच्चन अली (39, दोघेही उत्तरप्रदेश), करन प्रकाश जाधव (21, पिंपळी), सूरज सुनील जाधव (23, बहाद्दूरशेखनाका), ओंकार राजेंद्र गायकवाड (22, बाजारपेठ), सुनील सुमित महाडिक (21) हे जखमी झाले आहेत. पटेल हे आपल्या ताब्यातील छोटा हत्ती घेऊन मुंबई ते गोवा जात होते. त्यांची गाडी शुक्रवारी पहाटे 5.45 वाजता कापसाळ-दुकानखोरी येथे आली. यावेळी बोलेरो गाडीतून भात भरडण्यासाठी खेर्डी येथे घेऊन जाणाऱया संतोष बबन जावळे (कामथे, जावळेवाडी) यांच्या गाडीवर पटेल यांची गाडी आदळली.

ही धडक इतकी भीषण होती की, छोटाहत्तीचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला . पटेल त्यातच अडकून पडले. त्यांच्यासोबत रामपाल व बच्चन अली हे दोघे होते. या तिघांना तात्काळ खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र पटेल हे मृत झाल्याचे घोषित करण्यात आले, तर दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच हे. कॉ. विनोद आंबेरकर, पंकज पडेलकर, राजा चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर नाटेकर यांनी रूग्णालयात जाऊन जाबजबाब घेतले. या अपघाताची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. मात्र पटेल यांच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नाही.

पटेल हे कल्पवृक्ष डेकोरेटर्सची ही गाडी घेऊन गोवा येथे साहित्य आणण्यासाठी जात होते. मात्र त्यांच्या मालकाचाही पत्ता सापडलेला नाही. गेल्या आठ दिवसांत दुकानखोरी येथे झालेला हा दुसरा मोठा अपघात असून काही दिवसांपूर्वी टेम्पो दुचाकी अपघातात कैलास कांबळे हे ठार झाले आहेत.

पिंपळीत दुचाकीत अपघात

गजमलपिंपळी येथे गुरूवारी रात्री दोन दुचाकीत समोरासमोर अपघात झाला. यात दोन्ही दुचाकीवरील करन जाधव, सुमित महाडिक, सुरज जाधव, ओंकार गायकवाड हे जखमी झाले. यातील ओंकार याला किरकोळ दुखापत झाली, तर सुरज व सुमित याला कराड येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात नोंद झालेली नाही. तसेच शहरातील नाथ पै चौक येथे गुरूवारी रात्री दोन कारमध्ये अपघात होऊन या दोन्ही गाडय़ांचे नुकसान झाले. मात्र याची पोलीस स्थानकात नोंद नाही.

Related posts: