|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आमदार जोल्लेंमुळे निपाणीने अनुभवला ‘विकास’

आमदार जोल्लेंमुळे निपाणीने अनुभवला ‘विकास’ 

वार्ताहर / निपाणी

निपाणी विधानसभा मतदारसंघाची अवस्था आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलो आहे. यामुळे बदल निश्चितपणे जाणवत आहे. मतदारसंघ अनेक वर्षापासून विकासासाठी आसूसलेला होता. याची पूर्तता गेल्या पाच वर्षात आमदार शशिकला जोल्ले यांनी केली. यामुळे निपाणी मतदारसंघाला विकास अनुभवायला मिळत आहे, असे प्रतिपादन इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांनी केले.

येथील श्रीपेवाडी रोडवरील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या मैदानावर जोल्ले उद्योग समुहातर्फे आयोजित प्रेरणा उत्सवात ते बोलत होते. 24 जानेवारी रोजी शोभायात्रेने प्रारंभ झालेल्या या प्रेरणा उत्सवाचा सांगता सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला. यावेळी पांडुरंग काजवे महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

आमदार हळवणकर पुढे म्हणाले, जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणाऱया लोकप्रतिनिधीला आमदार म्हटले जाते. ही व्याख्या आमदार जोल्लेंच्या सेवेसाठी तंतोतंत जुळते. निपाणी मतदारसंघात आजपर्यंत झालेल्या आमदारांच्या कार्यात आमदार जोल्लेंचे कार्य सरस आहे. असे असताना बेछूट आरोप करत आहेत. पण आरोप करणाऱयांचे मे महिन्यात होणाऱया निवडणुकीत मतदारच डिपॉझिट जप्त करतील. आमदार जोल्ले यांच्यासाठी ही निवडणूक फक्त आमदारकीसाठी नाही तर कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदासाठी आहे. येथील मतदारांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन आमदार जोल्लेंना विजयी करून इतिहास घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.

अर्थसंकल्पाबाबत आमदार हळवणकर म्हणाले, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प यंदा सादर करण्यात आला आहे. आरोग्य, शेती, शिक्षण, व्यापार वृद्धीसाठी ठोस पाऊल उचलले आहेत. यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे सांगितले. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, डॉ. अच्युत माने, ऍड. संजय शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. तर परमात्मराज महाराज यांनी आशीर्वचन केले.

विविध स्पर्धा, शिवगर्जना महानाटय़ाचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम अशी रेलचेल असणाऱया या प्रेरणा उत्सवाची सांगता शाहीर धोंडीराम मगदूम यांच्या शाहिरीने झाली. या दरम्यान जीवन गौरवसह प्रेरणा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे आमदार जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध योजना निधी व साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला हिंदूराव शेळके, सहकारनेते आण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे संचालक समित सासणे, एम. पी. पाटील, प्रभाकर देशपांडे, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले, मलगोंडा पाटील, जयवंत भाटले, भारती आडदांडे, भरत चव्हाण, जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, नगरसेवक प्रवीण भाटले, राज पठाण, दीपक माने, दत्ता जोत्रे, विजय टवळे, सुषमा भाटले, निता बागडे, जयानंद जाधव, रोहन साळवे, अमित साळवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या.