|Monday, September 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ताणाशी सामना करताना…!

ताणाशी सामना करताना…! 

मॅडम नमस्कार! तुमच्याजवळ थोडंसं बोलायचं होतं. हं, बोला ना… मॅडम, मी गृहिणी आहे. घरची माणसं, आर्थिक स्थिती सारं तसं चांगलं आहे. परंतु अलीकडे माझी खूप चिडचिड होते. मुलं, शाळा, अभ्यास, टय़ूशनला सोडणं-आणणं, घरातील इतर कामे, सासू-सासरे, अधेमधे त्यांची आजारपणं, नातेवाईकांची ये-जा या साऱया धावपळीमुळे मनावर कसलं तरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं… कधी-कधी दडपण येतं. केव्हातरी उगीच दमल्यासारखं वाटतं. अलीकडे तर रुटिनचा कंटाळा येतो. तोच तोचपणा जाणवतो. बाकीचे म्हणतात, “घरीच तर असतेस. दमायला काय झालं तुला? काय उत्तर देणार यांना? कसला तरी ताण जाणवतो, मग उदास वाटतं काही वेळा मॅडम, मला हा कसला रोग वगैरे झाला नाहीये ना? मैत्रिणी म्हणतात की असं होतं गं, जरा घराबाहेर पड मोकळेपणानं. मलाही चिडचिड होणं ठीक वाटत नाही. तुम्ही काही सल्ला द्याल या आशेने आले आहे.’

वरील उदाहरणातील ‘तिच्या’सारखी अनेक माणसे भेटत असतात. ज्यांना वेगवेगळय़ा कारणांमुळे ताण-तणावांचा सामना करावा लागतो. खरंतर, अलीकडच्या काळामध्ये ‘स्ट्रेस’ हा शब्द सातत्याने कानावर पडत असतो. गतिमान जीवनशैलीमध्ये ‘ताण’ हा शब्द परवलीचाच झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.‘ताण’ म्हणजे एक प्रकारची अशी असुखकारक भावना आहे की, ज्यामुळे मनावर दडपण आल्यासारखं वाटतं. चिंता, काळजी निर्माण होऊन मानसिक आणि पर्यायाने शारीरिक थकवा जाणवू लागतो. ‘ताण’ हा रोग नाही तर ती एक अवस्था आहे. मात्र ताणाचे प्रमाण, तीव्रता, कालावधी जास्त राहिल्यास ते रोगाला आमंत्रण ठरू शकतं.

आपण सारेच कमी-अधिक प्रमाणात ताण-तणावांचा सामना करत असतो. परीक्षा, अभ्यास, करिअर, नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवनामध्ये वेगवेगळय़ा टप्प्यावर उद्भवणारे अनेक प्रश्न, शारीरिक विकासाचे टप्पे आणि अनेक गोष्टींसाठी लहानापासून वृद्धापर्यंत साऱयांनाच, कुठच्या ना कुठच्या टप्प्यावर ‘ताण-तणावाला’ सामोरे जावे लागते. खरंतर ताणाचे नेमके कारण, तो कशामुळे उद्भवला आहे, यावरून ताण हलका करण्यासाठी नेमकं काय करता येईल हे अवलंबून असतं. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात सातत्याने येणाऱया ‘ताण-तणावांचा’ सामना करण्यासाठी ताणाचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करत आपल्या जीवनशैलीचा भाग बनविणे अपरिहार्य झाले आहे.  वेळेचे नियोजन, कामाव्यतिरिक्तच्या छंदांची जोपासना, नियमित व्यायाम, लेखन-वाचन, कुटुंबामध्ये मनमोकळा संवाद, स्वयंसूचनांच्या माध्यमातून स्नायूंचे शिथिलीकरण (रिलॅक्सेशन), ध्यान-धारणा, दिवसाकाठी दहा मिनिटे पूर्ण स्वस्थ, शांत बसणे या आणि अनेक गोष्टी ताणाशी सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अनेकदा साध्या साध्या गोष्टीतूनही ताण उद्भवतो. रोजची कामे करताना दिनचर्या विसकळीत झाली तरीही आपण अस्वस्थ होतो. घर-नोकरी अशी कसरत करताना बहुतांश स्त्रियांना ‘स्ट्रेस’चा सामना करावा लागतो. अशावेळी वेळेचे नियोजन आणि कामांचा प्राधान्यक्रम (खूप महत्त्वाचे काम, थोडं कमी महत्त्वाचं, लगेच गरजेचं नसलेलं/कमी महत्त्वाचं) अशी आखणी केली तर दैनंदिन कामातील ओढाताण कमी होईल.जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावरही ताण कमी अधिक येणं अवलंबून असतं. तो दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर ताण-तणावातून सहजतेने मार्ग काढता येतो. नकारात्मक दृष्टिकोन ताण वाढविणारा ठरतो. काही घटना, परिस्थिती, प्रश्न जरी ‘ताण’ निर्माण करणारे असले तरी त्याची तीव्रता व्यक्तीच्या मनोवृत्तीवर अवलबूंन असते. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, एखादा विद्यार्थी, परीक्षा हे आपले ध्येय गाठण्यासाठीचे एक माध्यम आहे, प्रामाणिक प्रयत्नांनी हा टप्पाही पार केला पाहिजे अशा विचारसरणीचा असेल तर त्या विद्यार्थ्यांला परीक्षा हा उत्सुकतेचा अनुभव वाटेल. तो मनावर फार ओझं न घेता त्याला सामोरा जाईल. तर बाप रे, परीक्षा… झालं. आता पेपर कठीणच आला तर, मला काही आठवलंच नाही तर, वेळेत सोडवायला जमलंच नाही तर… असे विचार एखादा विद्यार्थी करत असेल तर त्याला परीक्षेची खूप भीती वाटून ‘खूप ताण’ उद्भवेल! विचार करण्याच्या पद्धतीवरही अनेकदा ‘ताण’ निर्माण होणं अवलंबून असतं. थोडा स्वस्थपणा मिळण्यासाठी रोजच्या धावपळीतून वेळ काढून आपल्या एखाद्या आवडत्या छंदाची जोपासना ही सकारात्मक ऊर्जा देऊन जाते. स्वयंसूचनांच्या माध्यमातून संपूर्ण शरीर शिथिल करत ‘रिलॅक्स’ होण्यानेही ताण हलका होण्यास मदत होते. चोवीस तासातील दहा मिनिटे तरी काहीही न करता शांत बसणं  गरजेचे आहे.

आपण चळवळय़ा लहान मुलांना कितीतरी वेळा म्हणतो, अरे बाबा, दहा मिनिटे तरी स्वस्थ बसायला काय घेशील? तेवढं तरी शांत बसावं रे… वगैरे वगैरे… म्हणजे पाच-दहा मिनिटे स्वस्थ बसण्याचे फायदे आपल्याला ठाऊक असतात परंतु चोवीस तासातील दहा मिनिटे तरी आपण स्वतः पूर्णपणे स्वस्थ, शांत बसतो का? काही जण कामावरून घरी आल्या आल्या हुश्श ।़ ।़ दमलो बाबा, करत लगेच टीव्हीचं बटणं ऑन करतात, कुणी लगेचच पेपर हातात घेतात, बऱयाचदा स्त्रिया तर दिसेल तो पसारा हातासरशी आवरत सुटतात, कुणी कुणाला फोन करतं, तर कुणी दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून वॉट्स अप, फेसबुक पहातं. हे सारं आपण आत्ता कुठे वेळ मिळाला असं म्हणत करत असतो परंतु आपण रिलॅक्सपणे हे सारं करतोय असं वरवर वाटत असलं तरी तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ‘मन शांत, स्वस्थ असणं’ ही गोष्ट यातून साधतच नाही. पूर्वीच्या काळी भिंतीला पाठ टेकून डोळे मिटून शांतपणे जपमाळ ओढणारी आजी, निवांतपणे झोपाळय़ावर झोके घेत बसलेले आजोबा, शतपावली उरकून लोडाला टेकून बसलेले काका, बाबा हे सारं आठवून पहा. दिवसाकाठी सर्व कामे उरकल्यावर निदान एकदा तरी खऱया अर्थी ते स्वस्थ बसत असत. आता त्या काळात जाणे तर आपल्याला शक्मय नाही परंतु रोज दहा मिनिटे तरी कोणत्याही प्रकारच्या करमणुकीच्या साधनांपासून स्वतःला प्रयत्नपूर्वक बाजूला करत खऱया अर्थी शांत  बसणे हे दैनंदिन ताण हलका करण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

ताणाशी सामना करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोणत्या गोष्टीचा ताण अधिक जाणवतो, त्याचे प्रमाण, तीव्रता किती आहे हे लक्षात घ्यायला हवं. ताणाचे प्रमाण सौम्य असेल, स्वाभाविक असेल तर अशावेळी एखादी कृती करायला वा ध्येय गाठण्यासाठी तो चालना देणारा ठरेल. तो मध्यम स्वरूपाचा असेल तर त्याच्या कारणांचा शोध घेऊन वर्तनामध्ये योग्य बदल करणे हितावह ठरेल. अवास्तव अपेक्षा करणारे, ताठर, हट्टी, दुराग्रही अहंकारी माणसे अधिक ताण अनुभवतात तर  वास्तवाचे भान असणारे, लवचिकता असलेले, पूर्वानुभवाचा उपयोग करून पुढे जाणारे लोक तुलनेने कमी ताण अनुभवतात. मात्र जर ताणाची तीव्रता, कालावधी जास्त असेल आणि त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होत असेल तर मात्र फार उशीर होण्यापूर्वी ‘मानसोपचार तज्ञांच्या’ मार्गदर्शनानुसार वाटचाल करणे हितावह ठरते.

संपूर्ण ताण विरहित आयुष्य कुणाचेच नसते परंतु बदलत्या परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये बदल करणे, सहनशीलता वाढविणे आणि आत्मनियंत्रण करणे या ताणाची अनुभूती कमी करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. हे कठीण वाटले तरी प्रयत्नसाध्य नक्कीच आहे. प्रयत्नपूर्वक काही गोष्टी केल्यास ‘ताणाचे व्यवस्थापन करणे’ नक्कीच साध्य होईल हे मात्र खरे.