|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बिल्डरधार्जिणा विकास आराखडा रद्द करा

बिल्डरधार्जिणा विकास आराखडा रद्द करा 

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची जोरदार मागणी

उल्हासनगर शहरातील सामान्य नागरिकांच्या घरादारांवर नांगर फिरवणारा बिल्डरधार्जिणा विकास आराखडा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे मंगळवारी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबधित अधिकाऱयांना बाबी तपासून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश डॉ. पाटील यांनी दिले. उल्हासनगर शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ासंदर्भात मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार रवींद्र फाटक, ज्योती कलानी, निरांजन डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, महापौर मीना आयलानी उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठय़ा प्रमाणात पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी न वाढवता पार्किंग टॉवर उभारणे, हाच यावरचा उत्तम उपाय असल्याचे किणीकर म्हणाले. तज्ञसमिती व महासभेने सुचवलेले आरक्षणातील बदल लागू करण्याची मागणी करतानाच शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीमधून रस्ते तयार करण्यात येणार असल्याने येथे काम करणाऱया हजारो कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे या ठिकाणचेही रस्त्यांचे आरक्षण बदलण्याची विनंती देखील डॉ. किणीकर यांनी डॉ. पाटील यांना केली.

उल्हासनगरमधील मुस्लीम बांधवांसाठी महानगरपालिकेने आधी दिलेल्या रिजन्सी कंपनीच्या जागेवरच कब्रस्थान उभारण्यात यावे, अशीही मागणी राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे या बैठकीदरम्यान केली. सद्यस्थितीला कैलाश नगर येथील जागा कब्रस्थानासाठी देण्यात आली असून अवघ्या 500 मीटरवर अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर असल्याने याठिकाणी कब्ा्रस्थान उभारणे उचित होणार नसल्याचे डॉ. किणीकर म्हणाले. तसेच यापूर्वी रिजन्सीच्या जागेवर दोन मयतही दफन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर शहरातील विकास आराखडय़ात सध्या अस्तित्वात असलेल्या वसाहती, झोपडपट्टी आणि बाजारपेठांच्या ठिकाणी हरित क्षेत्र (ग्रीन झोन) आरक्षित करण्यात आले असून रिंगरुटच्या नावाखाली 40 फुटांऐवजी 80 फूट रुंद रस्ते करण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील नागरिक, दुकानदार व व्यापाऱयांवर मोठय़ा प्रमाणात विस्थापित होण्याची वेळ येणार असल्याचे आ. डॉ. किणीकर म्हणाले.

Related posts: