|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विधानसभा सचिवालयातर्फे उद्या ‘राज्य युवक संसद’ कार्यक्रम

विधानसभा सचिवालयातर्फे उद्या ‘राज्य युवक संसद’ कार्यक्रम 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा विधानसभा सचिवालयातर्फे उद्या शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी गोमंतक मराठा समाज सभागृहात ‘राज्य युवक संसद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गोव्यातील युवकांना राजकीय व सामाजिक विषयाची जाणीव व्हावी तसेच युवकांना त्यांचे प्रश्न शंका राजकारण्यांना विचारता यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात यावेळी ‘युवकांचा राजकीय व सामाजिक सहभाग’ व ‘वाढत्या युवकांच्या आत्महत्या’ या दोन महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे, असे यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

 या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. होणार आहे यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत तसेच विधीमंडळ कामकाज मंत्री फ्रान्सिस डिसोझा व विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर उपस्थित असणार आहे. तद्नंतर ‘युवकांचा सामाजिक व राजकीय सहभाग’  या विषयावर चर्चासत्र होणार आहे. याला आमदार प्रसाद गांवकर मार्गदर्शन करणार आहे. दुपारी 12 वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खास मुलाखत पत्रकार प्रमोद आचार्य हे घेणार आहे. यावेळी उपस्थित युवकांना मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारता येणार आहे.

 भोजनानंतर दुपारी 2.30 वा. ‘युवकांच्या वाढत्या आत्महत्या’ या विषयावर आमदार दयानंद सोपटे मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर विद्यार्थी संसद सदस्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायं. 4.30 वा. या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे .यावेळी क्रिडामंत्री मनोहर आजगांवकर उपस्थित असणार आहे, असे यावेळी डॉ. प्रमोद सावत यांनी सांगितले.

 गोव्यात प्रथमच अशा प्रकारचा ‘राज्य युवक संसद’ कार्यक्रम आयोजित केला आहे. अन्य राज्यामध्ये असे कार्यक्रम केले जातात. गोव्यातील युवक सामाजिक, राजकीय व व्यवसायिक क्षेत्रात पुढे यावे त्यांना राजकारणाचा अनुभव यावा यसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात 18 ते 45 वयोगटातील लोक सहभागी  होऊ शकतात. महाविद्यालयांना निवेदन पाठविले आहे. सुमारे हजारभर युवकांची या कार्यक्रमाला उपस्थिती असण्याची शक्यता यावेळी डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.