|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण लिलावासह सर्व पर्यायांवर विचार करणार

खाण लिलावासह सर्व पर्यायांवर विचार करणार 

प्रतिनिधी /पणजी :

खाण व्यवसायातून जास्तीत जास्त महसूल प्राप्त करण्यासाठी सरकार लिलावासह आवश्यक त्या सर्व पर्यायावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढील सहा महिन्यात खाणी सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर एक डझनपेक्षा जास्त कंपन्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका व्यक्त केली. खाण व्यवसायातून सरकारचा महसूल वाढविण्यावर सरकारचा भर राहाणार आहे. सरकार सर्व पर्यायांचा विचार करीत असून खाण लिजांचा लिवाव हाही एक पर्याय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने लिजांचे नुतनीकरण केले होते. मात्र सदरचा आदेशच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे रद्दबातल ठरला आहे. त्यामुळे लिजांचे नुतनीकरण रद्द झाले आहे.

खनिज उत्खननाला बंदी, निर्यातीवर नाही

मात्र उर्वरित जी खाण लीजे आहेत ती नवीन कायद्यानुसार 2020 पर्यंत अस्तित्वात आहेत. मात्र त्याबाबत आपण कायदेशीर अभ्यास करणार आहे. खाण व्यावसायिकापेक्षा सरकार जनतेचे हित जपण्यावर भर देईल. 15 मार्चनंतर राज्यातील खनिज उत्खनन बंद होणार आहे. तोपर्यंत खनिज उत्खनन करणे शक्य आहे. त्याचबरोबर निर्यातही करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने लिजांचे नुतनीकरण रद्द केले आहे पण निर्यातीवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे जे खनिज डंप आहेत त्याचा लिलाव करणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.