|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’

नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’ 

कौटुंबिक नातेसंबंधांवर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. आजच्या काळात प्रत्येक नात्याकडे माणूस हा व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहतो. मग ते नाते कितीही रक्ताचे का असू नये? या व्यावहारिक जीवनात भावनेचे, जिव्हाळय़ाचे नाते मागे पडत आहे. अशाच नातेसंबंधांवर ‘आपला मानूस’ चित्रपट बेतलेला आहे. कुटुंबातील भावनिक नाते चित्रपटामध्ये एका रहस्यमय कथानकाद्वारे उलगडण्यात आले आहे. चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत आहेत. सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन तर अजय देवगणने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीला बिल्डिंगमधून एक माणूस खाली पडतो. घडलेल्या घटनेच्या पंचनाम्यासाठी क्राईम ब्रँच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती नागरगोजे (नाना पाटेकर) यांची नियुक्ती होते. त्यानंतर शहानिशा करण्यासाठी इमारतीवरून पडलेली व्यक्ती आबा गोखले यांचा मुलगा राहुल (सुमीत राघवन) याच्या ऑफिसात जातात. तेथे राहुलची चौकशी करतात. राहुलला शॉक बसतो की आबाची केस ही क्राईम ब्रँचकडे दिली. त्यानंतर चौकशी करायची वेळ आबांच्या सुनेवर भक्ती (इरावती हर्षे) यांच्यावर येते. चौकशीतून आबांचा अपघात झाला की आत्महत्या करण्याचा प्रयत्न यामध्ये चित्रपटाचे कथानक पुढे जाते. आबा विधुर गृहस्थ आहेत. ते आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत असतात. मुलगा, सून आणि नातू यालाच आपले विश्व मानणारे आबा. पण, सून नातवाला बोर्डिंगमध्ये टाकून त्याच्यापासून आपल्याला तोडते. त्यामुळे त्यांच्या नात्यात तिढा निर्माण होतो. तो पुढे वाढत जातो. वृद्धापकाळात रिकामपणाने आबांना घेरलेय. सून मुलाला आणि नातवाला आपल्यापासून दूर करेल या भीतीने आबा आतल्या आत कुंठत असतात. त्याच दरम्यान आबा बाल्कनीतून पडतात. प्रथम हा आत्महत्येचा प्रयत्न आहे, असे मारुती नागरगोजे सिद्ध करतात. मात्र, त्यानंतर या शोधमोहिमेला वेगळी कलाटणी मिळून हा आत्महत्येचा प्रयत्न नसून खुनाचा प्रयत्न आहे हे नागरगोजे पुराव्यानिशी सिद्ध करतात. त्यानंतर खुनी कोण आहे या थरारक खेळास सुरुवात होते.

कौटुंबिक जिव्हाळय़ाची कथा-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी एका रहस्यपटातून प्रेक्षकांसमोर आणली आहे. चित्रपटाची पटकथा लिहिताना सतीश राजवाडे यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहील असे योग्य संवाद सर्व पात्रांना दिले आहेत. त्यामुळे पात्रांची संवाद शैली समर्पक वाटते. नाना पाटेकर यांच्या वाटेला संवाद अधिक आले आहेत. त्या भूमिकेला नानाने आपल्या अभिनयातून उत्तम न्याय दिला आहे. एका कौटुंबिक जिव्हाळय़ाची कथा ते रहस्यपट प्रवासात प्रेक्षकांना खिळून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. कौटुंबिक नातेसंबंध आणि त्यातील प्रेम हळुवारपणे उलगडणाऱया सतीश राजवाडे यांचा हातखंड आहे. हेच कौशल्य त्यांनी ‘आपला मानूस’ या रहस्यपटातून दाखवले आहे. उत्तरार्धात कथानकातील रहस्य अधिक ताणले जाते त्यामुळे कथेचा मूळ गाभा हरवतोय की काय असे वाटत असताना दिग्दर्शक राजवाडे कथानकावर आपली पकड पुन्हा घट्ट करतो. आणि प्रेक्षकांना पुन्हा रहस्याकडे आणून ठेवतो.

नाना पाटेकर यांनी मारुती नागरगोजे आणि आबा गोखले यांची दुहेरी भूमिका वठवली आहे. या दोन्ही भूमिका नानाने ठसठशीत वठवल्या आहेत. तर सुमीत राघवनने वडील आणि बायकोच्या नात्यात भरडला जाणारा नवरा उत्तम सादर केला आहे. इरावती हर्षेने बायको आणि सुनेची उत्तम भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या नावातच कथेचे सार आहे. आजची तरुण पिढी, त्यांना स्वातंत्र्याची लागलेली आसक्ती, त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारा दुरावा आणि भावनात्मक बोथटपणा त्यानंतर पुन्हा मायेच्या ओलाव्याकडे परतणारी विभुक्त कुटुंबे यावर चित्रपट भाष्य करतो. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजभान जपणारे आहे. हेच लक्षात घेत सतीश राजवाडे यांनी वृद्धांना आपल्या माणसांकडून मायेची गरज आहे, तो मायेचा ओलावा आजच्या पिढीने द्यावा, असा संदेश दिला आहे. चित्रपटात एकही गाणे नाही तरी गतिमान कथानक, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाले आहे.

चित्रपट का पाहावा

कौटुंबिक कथा रहस्यपटातून मांडली आहे.

चित्रपट का पाहू नये

याचे काहीच कारण नाही