|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रामाणिक बँकांना मदत करा बुडव्यांना नको

प्रामाणिक बँकांना मदत करा बुडव्यांना नको 

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा केंद्र सकराकला टोला

प्रतिनिधी/ कोल्हापूर

बँकांची थकबाकी राहाणे गैर नाही, पण चुकीच्या माणसाला कर्ज देण्याने राहीलेली थकबाकी अयोग्य आहे. सहकारी बँकांनी समाजातील शेवटच्या घटकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने इतर बँकांप्रमाणे आर्थिक मदत केली पाहीजे. प्रमाणिक बँकांना मदत करा बुडव्यांना नको. असा टोला  माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावला. रविवारी दुपारी राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात पवार बोलत होते. मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉनमध्ये हा समारंभ झाला. 

भास्करराव जाधव यांनी गव्हर्मेंट सर्व्हंट्स सोसायटीची 1917 साली स्थापना केली. पुढे या सोसायटीचे नामकरण राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँक असे करण्यात आले. यंदा संस्थेचे शतकमहोत्सवी वर्ष होते. शतकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ रविवारी झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महराज छत्रपती होते. बँकेचे संचालक एम.एस.पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बँकेचे अध्यक्ष रविंद्र पंदारे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी बँकेच्या इतिहासाला उजाळा दिला. बँकेच्या वाटचालीत झालेली स्थित्यंतरे यांचा आढावा घेतला. शाहीर राजू राऊत यांनी पोवाडय़ातून राजर्षी शाहूंच्या कर्तत्वाचा आलेख मांडला. याप्रसंगी वटवृक्ष या स्मृतीग्रंथाचे प्रकाश करण्यात आले. तसेच शरद पवार यांच्या हस्ते संस्थेच्या नुतनीकृत प्रधान कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन रिमोटकंट्रोलने करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी देशाच्या सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम केले आहे. सहाकाराच्या माध्यमातून गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेने सरकारी कर्मचाऱयांना एकत्र आणले. तसेच त्यांना आर्थिक पाठबळ उभे करून दिले. सध्या सहकारावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र सहकारी संस्थांनी चांगले काम करून हे प्रयत्न हाणून पाडले पाहीजेत. सहकारी संस्थांवर जाचक अटी घातल्या जात असतानाही गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेचे काम कौतुकास पात्र आहे.’

 यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, ‘सरकारी कर्मचाऱयांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या सोसायटीचे रुपांतर आता बँकेत झाले आहे. रिजर्व्ह बँकेचे लायसन्स असणारी आणि शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेली सरकारी कर्मचाऱयांची ही राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेने केवळ आर्थिक व्यवहार केले नाहीत तर महिलांना पद्माराजे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. एक महिला चार महिलांना सुशिक्षीत करण्याचे काम करते. महिला पुढे येण्यानेच देश पुढे जाईल.’

शरद पवारांनी मनोगतामध्ये सहकार चळवळ, महिला सबलीकरण आणि केंद्रीय पत धोरणाचा आढावा घेतला. यावेळी पवार म्हणाले, ‘सहकारी बँकांनी देशातील शेवटच्या व्यक्तीला आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करणे हाच सहकारी बँकेचा मुळ उद्देश आहे. त्यांनी दिलेल्या कर्जांची वसुली नीट झाली नाही की थकबाकी राहते. त्यामुळे बँका अडचणीत येतात. बँकांची थकबाकी राहाणे गैर नाही, पण चुकीच्या माणसाला कर्ज देण्याने राहीलेली थकबाकी योग्य नाही. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱया बँकांना इतर बँकांप्रमाणेच आर्थिक मदत केली पाहीजे पण बुडव्यांना नको. सहकारी बँक  चालवणे आता सोपे राहीले नाही. सहकारी बँकेतील थकबाकीसाठी संचालक मंडळाला जबाबदार धरणे मला मान्य नाही. सहकारी संस्थांमध्ये चांगली माणसे असली की संस्था चांगली चालते. काही पदाधिकाऱयांच्या चुकीच्या निर्णयामुळे संस्था अडचणीत आली तर ती लगेच बरखास्त करणे योग्य नाही. म्हणूनच आम्ही 97 वी घटना दुरुस्ती करून प्रशासकाच्या कारभाराला सहा महिन्याची मर्यादा घातली. सहकार चळवळ टिकली पाहीजे. तरच शेवटच्या घटकाला आर्थिक पाठबळ मिळेल.’  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.

या सोहळ्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदीता माने, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.संजय मंडलिक, माजी आमदार के.पी.पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी महापौर आर.के.पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती आदील फरास हे उपस्थित होते. 

पंदारे यांचा असाही योगायोग

गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेमध्ये पंदारे कुटूंबियांची सत्ता आहे. जेव्हा सुवर्ण महोत्सवी वर्ष झाले तेव्हा वसंतराव पंदारे अध्यक्षस्थानी होते. आज शतक महोत्सवी वर्षाची सांगता सोहाळा असून त्यांचे चिरंजीव रविंद्र पंदारे संस्थेचे अध्यक्ष आहेत. काही कालावधी सोडला तर पंदारे पितापुत्रांची बँकेवर एकहाती सत्ता आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही बँक चालवली आहे.

…म्हणूनच सभासद आहे पण संचालक नाही

चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्यामुळे अनेक संस्था बंद पडल्या. यामध्ये संचालकांना जबाबदर धरण्यात आले. राज्यातील सहकारी संस्थांचे अनेक संचालकांना जेलमध्ये जावे लागले. सहकारी संस्थांचे धोरण हे सामान्य नागरीकांना आर्थिक पाठबळ देण्याचे असते. संस्थेवर काही संकट आल्यानंतर किंवा काहीबाबींची पूर्तता केली नाही म्हणून संचालकांना दोषी ठरविणे चुकीचे आहे. या सर्व कारणामुळेच मी एकाही संस्थेचा पदाधिकारी झालो नाही. कारखान्यांना सभासद आहे मात्र, संचालक नसल्याचे खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

हिमालय नको संह्याद्री व्हा

आपल्या मनोगतामध्ये मुश्रीफ म्हणाले, गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे. त्यामुळे त्यांच्या सभासदांना आमच्या केडीसी बँकेतून कर्ज घ्या असे मी म्हणार नाही. प्रत्येक कार्यक्रमात मी सांगतो की जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहोत. पण या सोहळ्या मला असे म्हणता येणार नाही. हाच धागा पकडून पवार म्हणाले, हिमालयाचा बर्फ कधी वितळेल सांगता येत नाही. त्यामुळे हिमालयाप्रमाणे नव्हे तर संह्याद्रीच्या काळ्या पाषाणाप्रमाणे पाठीशी उभे रहा. या काळ्या पाषाणाला जर कोणी टक्कर दिलीच तर पाषाण फुटत नाही पण डोके मात्र फुटते. असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 मान्यवरांचे सत्कार

गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या कार्याक्रमावेळी श्रीमंत शाहू महाराज यांचा डि.वाय.पाटील विद्यापीठकडून डी. लिट मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याचवेळी खासदार शरद पवार यांचाही पद्मविभूषण मिळल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बँकांचे ज्येष्ठ संचालकांचाही सत्कार करण्यात आला. सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

Related posts: