|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुतळय़ांबाबतचे ठराव बाजूला ठेवण्याची शक्यता

पुतळय़ांबाबतचे ठराव बाजूला ठेवण्याची शक्यता 

प्रतिनिधी/ पणजी

विधानसभा संकुलात जॅक सिक्वेरा यांच्यासह टी. बी. कुन्हा, डॉ. राममनोहर लोहिया, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्याबाबत आलेल्या ठरावांवर सभापती प्रमोद सावंत आज सोमवारी निर्णय घेणार आहेत. सध्या पुतळय़ांच्या राजकारणावरून गोव्यातील राजकारण बरेच तापले आहे. त्यामुळे ठराव चर्चेस येण्याअगोदरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुतळय़ांसदर्भात ठराव विधानसभेत मतदानाला गेल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता असल्याने सोमवारी या ठरावावर सभापती महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. विधानसभा संकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारावा यासाठी भाजपचे मायकल लोबो, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीने ठराव आणले आहेत. राष्ट्रवादीतर्फे चर्चिल आलेमाव यांनी तर काँग्रेसचा 16 आमदारांच्या सहीनिशी ठराव आला आहे. त्याचबरोबर सरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाने टी. बी. कुन्हा आणि डॉ. राममनोहर लाहिया यांचा पुतळा उभारावा यासाठी ठराव आणला आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा यासाठी ठराव आणला आहे. मगो आणि राजेश पाटणेकर यांनी आणलेल्या दोन वेगवेगळय़ा ठरावामुळे पुतळय़ांच्या मागणीतील गुंतागुंत वाढली आहे.

सभापती बाजूला ठेवू शकतात ठराव

जरी वेगवेगळे ठराव राजकीय पक्षांनी आणि वैयक्तिक आमदारांनी आणले असले तरी त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सभापतीना आहे. या खासगी ठरावाना मान्यता द्यावी की नाही हे सभापती ठरविणार आहेत. या ठरावामुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सभापती हे ठराव बाजूस ठेवू शकतात.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी जॅक सिक्वेरांच्या पुतळय़ाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाठिंबा देणाऱयांची संख्या 20 एवढी होऊ शकते. भाजपने व मगोने जॅक सिक्वेरांच्या पुतळय़ाला विरोध केला आहे. त्यामुळे भाजप, मगो व अपक्ष आमदारांची संख्या 19 एवढी होते. त्यामुळे ठराव मतदानाला गेल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे सर्व ठराव बाजूला ठेवण्याचीच जास्त शक्यता आहे. गोव्यातील जनतेचे लक्ष सध्या या ठरावाच्या राजकीय खेळीकडे आहे.

Related posts: