|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडात हजारो मुस्लीम महिलांचा मोर्चा

कराडात हजारो मुस्लीम महिलांचा मोर्चा 

प्रतिनिधी/ कराड

पेंद्र सरकारने तयार केलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात दुपारी शुक्रवारी शहर व परिसरातील हजारो मुस्लीम महिलांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व जमियत ए उलेमा हिंद कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन केले होते. तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. जमियत उलमा ए हिंदचे पदाधिकारी व मुस्लीम बांधवही उपस्थित होते.

शुक्रवारी दुपारी तीन वाजता रेव्हिन्यू क्लबनजीकच्या मक्का मस्जिदपासून या मेर्चास प्रारंभ झाला. मुस्लीम समाजातील महिला, तरूणी, विद्यार्थिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तलाक विधेयक रद्द करा, शरियतमध्ये हस्तक्षेप करू नका, अशा आशयाचे विविध फलक महिलांच्या हाती होते. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर तहसीलदार राजेंद शेळके यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा मोर्चा मक्का मस्जिदमध्ये आला. तेथे दुवा होऊन मोर्चाची सांगता झाली.

पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधनाने मुस्लिमांना मुस्लीम पर्सनल कायद्यांतर्गत आपले कौटुंबिक जीवन इस्लामी शरियतनुसार जगण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. परंतु केंद सरकारने जे तिहेरी तलाक विधेयक तयार केले आहे, ते इस्लामी शरियतच्या पूर्ण विरोधात आहे. महिला स्वातंत्र्यांच्या नावाखाली मुस्लीम कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणार आहे. केंद्र सरकारने मुस्लीम पर्सनल लॉ, इस्लामी कायदेतज्ञ, उलेमा, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी यांच्याशी कोणतीही चर्चा न करता घाईगडबडीत हे विधेयक लोकसभेत सादर केले. लग्न व तलाक याला फौजदारी स्वरूप देण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाप्रमाणे तोंडी तलाकच मान्य नाही तर तलाक दिला म्हणून पुरूषाला तीन वर्षे शिक्षा कशी करता येईल? शिक्षा दिली तर पत्नी व मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोणाची? तुरूंगातून आल्यानंतर संसारात निर्माण होणाऱया अडचणी या विधेयकामुळे होणार असल्याने ते रद्द करावे.

तिहेरी तलाक विधेयक रद्द करावे, शरियतमध्ये हस्तक्षेप करू नये, या मागणीसह राष्ट्रपतींनी संसदेत भाषणात मुस्लीम महिलांच्या उच्चारलेले वाक्य रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली.

मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आला होता. मोर्चामुळे भेदा चौक, मार्केट यार्ड परिसरात वाहतूक विस्कळीत झाली.