|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोळशाचा कलह इथेच संपत नाही, तोही कायदय़ाच्याच कचाटय़ात

कोळशाचा कलह इथेच संपत नाही, तोही कायदय़ाच्याच कचाटय़ात 

कोळसा विरोधी गोवा की प्रदूषण विरोधी गोवा हाच खरा प्रश्न

प्रतिनिधी/ वास्को

वास्कोतील कोळशाने निर्माण केलेला कलह इथेच संपत नाही. एमपीटीने प्रदूषण अमान्य केले तरी प्रदूषणाची भीती ही संपणारी नाही. कोळसा विरोधी गोवा शांत असला तरी ती वरवरची शांतता आहे. भविष्यात कोळसा विरोधी गोवा विरूध्द प्रदूषण विरोधी गोवा असेही चित्र निर्माण होऊ शकते. तुर्तास मुरगाव बंदरातील साऊथ वॅस्ट पोर्ट लिमिटेडची कोळसा हाताळणी सुरळीत आहे. पुढील आठ दिवसांत ही हाताळणी बंद होऊ शकते. खनिज उद्योग कायदय़ाच्या कचाटय़ात सापडलेलाच आहे. आता कोळसाही त्याच मार्गाने जाऊ लागला आहे.

आठ दहा दिवसांत जेएसडब्ल्यूची कोळसा हाताळणी बंद होण्याची शक्यता

  सरकारने जेएसडल्ब्यू कंपनीची कोळसा हाताळणी अतिरीक्त कोळसा हाताळल्याचा आरोप ठेवून बंदीचा आदेश काढलेला आहे. परंतु उच्च न्यायालयाने या कंपनीला येणारी जहाजे खाली करण्याची परवानगी दिलेली आहे. बारापैकी सहा जहाजांचे काम आटोपलेले आहे. अन्य दोन जहाजांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे पुढील आठ दहा दिवसांत कंपनीची कोळसा हाताळणी बंद होऊ शकते.  सरकारच्या या निर्णयाचा मुरगाव बंदराला आणि कोळसा कंपनीला थेट फटका बसलेला नसला तरी संकट दरवाजाजवळ आलेले असल्याने मुरगाव बंदरातील दोन्ही प्रमुख कामगार संघटनांनी सरकारच्या बंदीला विरोध करून बंदी उठवण्याची मागणी केली. वास्कोतील प्रदूषण धोक्याबाहेर नसल्याचा दावा करून त्यांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. रोजगार बचाव अभियानची स्थापना झाली आणि रोजगार वाचवण्याची जोरदार मागणीही झाली. प्रदूषण नाकारण्यात आले आणि प्रदूषणाविरूध्द आवाज उठवणाऱयाविरूध्द टीकाही झाली.

कोळशामुळेच एमपीटीच्या विस्तार प्रकल्पांना सततचा विरोध

  कोळसा प्रदूषणाविरूध्द मागच्या साधारण वर्षभरापासून आवाज उठू लागला होता. गोवा अगेन्स्ट कोल त्याचसाठी स्थापन झाली होती. या संघटनेने गोव्यातील बऱयाच गावागावांमध्ये आपले कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत. एमपीटीच्या विस्तार प्रकल्पांसंबंधी मागच्या एप्रील महिन्यात झालेल्या जाहीर जनसुनावणीतही या संघटनेने कोळशाला असलेला आपला विरोध तीव्रतेने दाखवून दिला होता. कोळशाला असलेल्या विरोधामुळेच एमपीटीच्या विस्तार प्रकल्पाला जाहीर जनसुनावणीत विरोध झाला होता. ही सुनावणी एकतर्फी झाली होती यात संदेह नाही. प्रकल्पांच्या समर्थनात एकही नागरिक उठला नव्हता हे विशेष. कोळशाला होणारा विरोध वेळोवेळी व्यक्त झालेला आहे. समुद्रातील गाळ उपसणे म्हणा कींवा नदय़ांचे राष्ट्रीयीकरण म्हणा, एमपीटीशी निगडीत सर्वच प्रकल्प हे कोळसा हाताळणीच्या विस्तार प्रकल्पांची सोय असल्याचे गोवा ऍगेन्स्ट कोलला वाटत आलेले आहे. त्यामुळेच एमपीटीच्या प्रकल्पांना विरोध होत आहे. सर्व विरोधामागे होणारे कोळसा प्रदूषण आणि भविष्यात अधिक वेगाने होऊ शकणारे कोळसा प्रदूषण हेच कारण आहे. मात्र, कोळशाला विरोध करणाऱयांविरूध्द आवाज उठवायला आतापर्यंत कुणी तयारी झाले नव्हते.

कोळसा हाताळणी बंदी आदेश आल्यानंतरच विरोधी गटाचा उदय

  जेएसडब्ल्यू कंपनीच्या कोळसा हाताळणी बंदीचा आदेश आल्यानंतरच कोळसा विरोधकांवर टीका करणारा गट उदयास आला. ते टीका करूनच थांबले नाहीत तर रस्त्यावर उतरून शक्तीप्रदर्शनही केले. रस्त्यावर उतरणारे सर्वच मुरगाव बंदर, बंदरातील खासगी कंपन्या, माल हाताळणी आणि एमपीटीशी संबंधीतच होते. या टीकाकारांना उत्तर देताना कोळसा विरोधकांनी कोळशाच्या प्रश्नावर थेट सार्वजनिक चर्चेचे आव्हान दिलेले आहे. रोजगार वाचवण्यासाठी कामगारांनी शक्तीचे प्रदर्शन केल्यानंतरही कोळशाच्या प्रश्नावर वास्को व मुरगावच्या आमदारांनी प्रदूषण सहन केले जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले व सरकारच्या कोळसा हाताळणी बंदीचे समर्थनही केले. वास्को मुरगावांतील त्यांच्या राजकीय विरोधकांनीसुध्दा प्रदूषणामुळेच कोळशाला विरोध केला आहे. मुरगावच्या नगराध्यक्षांनीही प्रदूषण विरोधी सूर व्यक्त केला. वास्कोतील काँग्रेस पक्षाच्या नेत्यानेही प्रदूषण आणि कोळसा प्रदूषण विरोधी भुमिका मांडली. डॉक्टरांनीही वास्कोतील प्रदूषण मान्य केले. लोकांच्या आरोग्यावर परीणाम होत असल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला. काहीनी थेट कोळशालाच दोष दिला. काही मान्यवर नागरिकांनीही प्रदूषणाविरूध्द आपल्या तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. प्रदूषण रोखणे शक्य नसल्यास उद्योगच बंद करा असा या नागरिकांचाही सूर होता.

कोळसा प्रश्नावर न्यायालयात हस्तक्षेप हा आंदोलनाचा भाग असण्याची शक्यता

  मात्र, एमपीटी आणि रोजगार बचाव अभियानने प्रदूषणाचे दावे फेटाळले आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचा दाखला देत ते आपले दावे खरेच असल्याचे सांगतात. प्रदूषणाचा मुद्दा हा काही लोकांनी केलेल्या गैरप्रचाराचा भाग किंवा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज असल्याचा त्यांचा दावा आहे. परंतु कोळसा हाताळणीने वास्कोत निर्माण केलेला कलह इथेच संपत नाही. येणाऱया काळात तो बराच दूरवर पसरण्याची शक्यता आहे. कोळसा विरोधी गोवामध्ये सध्या शांतता असले तरी ही वरवरची शांतता आहे. खनिज उद्योगाला पुन्हा लगाम घालण्याचे कार्य ज्यांनी केले आहे, त्या क्लाऊड आल्वारीस यांनी कोळसा प्रश्नावर न्यायालयात हस्तक्षेप केला आहे. हा हस्तक्षेप कोळसा विरोधी आंदोलनाचाच भाग असू शकतो. खनिज उद्योग कायदय़ाच्या कचाटय़ात सापडलेलाच आहे. कोळसाही त्याच मार्गाने जात आहे. इथे रोजगाराची जटील समस्या निर्माण होणारच आहे. त्यामुळेच राजकीय नेते, कामगार, त्यांच्या कामगार संघटना, एमपीटी व्यवस्थापन, डॉक्टर, नागरिक अशा सर्वांनीच अपवाद वगळता प्रदूषणालाच आपल्या प्रतिक्रीयामधून विरोध व्यक्त केलेला आहे. कोळशाला  विरोध केलेला नाही. कामगारांबरोबरच या सर्व घटकांना उद्योग आणि रोजगाराचीही चिंता आहे. प्रदूषण रोखून उद्योग वाचवण्यासाठी ते आपल्यापरीने उपाययोजनाही सुचवतात. प्रदूषणाला विरोध आणि उद्योग वाचवण्याचीही सुचना त्यांच्या प्रतिक्रीयामधील समान धागा असल्याचे दिसून आले. त्यामुळे भविष्यात कोळसा विरोधी गोवा हवा की प्रदूषण विरोधी गोवा असे दोन भिन्न विचार निर्माण होऊ शकतात. ज्यांना कोळसाच नको ते कोळसा विरोधी बनतील आणि ज्यांना उद्योग आणि रोजगाराची चिंता आहे, ते प्रदूषण विरोधी गोव्याची बाजु घेतल्याशिवाय राहणार नाहीत असेच चित्र गेल्या पंधरा दिवसांत जनमानसाचा कानोसा घेतला असता दिसून आले.

Related posts: