|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवजयंती तारखेनुसारच साजरी करावी!

शिवजयंती तारखेनुसारच साजरी करावी! 

‘शिवाजी महाराजांचा खरा इतिहास’ व्याख्यानात श्रीमंत कोकाटेंचे आवाहन: जिजाऊच महाराजांच्या गुरु, इतिहास विसरण्यासाठी दादोजींचे नाव पसरविले!

प्रतिनिधी / कणकवली:

न्याय, समता, बंधूता आणि धार्मिक एकात्मता राखतच शिवाजी महाराजांनी राज्य केले. मात्र, ते मुस्लीम धर्माविरोधात होते, हा चुकीचा इतिहास पसरविला गेला आणि त्यांच्या नावावर दंगली घडविल्या गेल्या. शिवाजी महाराज दंगलींच्या विरोधात होते. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास विसरण्यासाठीच दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते, असे पसरविले गले. पण त्यांच्या खऱया गुरु या जिजाऊ माताच होत्या. हे इतिहासकारांनीच संशोधनातून शोधून काढले. जे लोक आपल्या पूर्वजांची जयंती तारखेनुसार साजरी करतात, तेच लोक महाराजांची जयंती मात्र तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह करतात. हा डाव उधळून लावण्यासाठी 19 फेब्रुवारी या जन्मतारखेलाच शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी येथे केले.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे येथील स्वामी विवेकानंद सभागृहात ‘शिवाजी महाराजांचा खरा इतिहास’ या विषयावर कोकाटे यांचे व्याख्यान झाले. यावेळी कोकाटे यांनी शिवाजी महाराजांचे शेती धोरण अंमलात आले असते, तर महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातच शेतकऱयांच्या आत्महत्यांची रांग लागली नसती, असेही सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाचे नेते तथा आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

सत्यनारायण पूजेच्या विरोधात शिवाजी महाराज!

शिवाजी महाराज बुद्धी प्रामाण्यवाद मानणारे होते. ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना ज्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा राजाराम पालथा जन्माला आला, असे सांगितले, तेव्हा महाराजांनी तो दिल्ली पालथी घालेल, असे सांगितले. धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेची परंपरा ज्यांनी निर्माण केली, त्या विरोधात महाराज होते. महाराजांनी साधन नसतानाही इतिहास निर्माण केला कारण ते लोकांमध्ये जात होते. लोकांचेच होत होते. मात्र, पाठय़पुस्तकात महाराजांचा चुकीचा इतिहास आजवर दिला गेला. महाराजांनी दिडशे किल्ले बांधले पण एकाही किल्ल्यावर सत्यनारायण पूजा घातली नाही. सत्यनारायण ही रोजगार हमी योजना आहे, पोट भरणाऱया ब्राह्मणांची. म्हणून लग्न झाल्यावर सत्यनारायण पूजा घालण्याऐवजी शिवाजी महाराजांचे दर्शन घ्या, असे ते म्हणाले.

महाराज मुस्लीमांविरोधात नव्हते!

धर्माच्या नावाखाली ज्यांनी मूत्र माणसाला पाजले, त्या विरोधात संत तुकाराम महाराज अनुद्गार काढतात. हा शिवाजी महाराजांच्याच विचाराचा धागा आहे. कारण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज उपस्थित असायचे. शिवाजी महाराजांचा लढा मोगलाई विरोधात होता. मुस्लीमांविरोधात नव्हता. गेले 100 वर्षे चुकीचाच इतिहास आपल्याला सांगितला गेला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीम सैनिक होते. त्यांचे 11 अंगरक्षक मुस्लीम होते. हैद्राबादच्या कुतुब शहाने महाराजांना एक महिना ठेवून घेतले. शिवाजी महाराजांचा इतिहास दंगल घडविण्यासाठी नाही. शिवाजी महाराज धार्मिक दंगलीविरोधातच होते, असेही कोकाटे यांनी सांगितले.

संभाजीराजे धार्मिक नव्हते!

संभाजी राजे धर्म ग्रंथाचे अभ्यासक होते, पण ते धार्मिक नव्हते. त्यांनी महाराजांना धर्माची परंपरा सांगितली. शिवाजी महाराज वैदीक परंपरेविरोधात होते. महाराजांना अनेक भाषा येत होत्या. आपणही आपल्या प्रगतीसाठी मराठी बरोबर इतर भाषा शिकल्या पाहिजेत. नवं निर्मिती करणाऱयांची भाषा वाढते. मारामारी करणाऱयांच्या भाषेत वाढ होत नाही. महाराजांनी जातीच्या, भाषेच्या, धर्माच्या राजकारणाने कोणाला राजकारण करू दिले नाही. सगळय़ा मोठय़ा राजकारण्यांच्या जयंत्या तारखेनुसार मग महाराजांची जयंती तिथीनुसार का? म्हणूनच आपण त्यांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनीच जयंती साजरी करायची, असेही ते म्हणाले.

महाराजांचे मावळे साऱया जाती धर्मांचे!

कोकाटे म्हणाले, शिवाजी महाराज साऱया जगाचे नेते होते. प्रेडल क्रस्टोनेही महाराजांकडूनच प्रेरणा घेतली. त्याकाळी पुढारलेल्या युरोपातही लहान मुले, स्त्राr यांना गुलामाची वागणूक मिळत होती. मात्र, महाराजांनी परस्त्राrचाही आदर केला. महाराजांचे मावळे साऱया जाती धर्मांचे होते. प्रबोधनकार ठाकरे म्हणत, शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना 33 कोटी देवही बाद ठरतात. शिवाजी महाराज कार्यकर्त्याला वाऱयावर सोडणारे नव्हते. महाराजांनी आपले दिवंगत सहकारी प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी आपल्या राजाराम या मुलाचे लग्न लावले. यातूनच त्यांच्या मनाचा आणि आपल्यापेक्षा लहान माणसाची त्यांना असलेली करुणा लक्षात येते.

खासगी आणि सार्वजनिक जीवनात भेद नाही!

खासगी आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी कधी भेद केला नाही. महाराज निर्व्यसनी होते. त्यांनी आपल्या राज्यात कधीच मद्याला परवानगी दिली नाही. शिवकाळात एकाही शेतकऱयाने कधीही आत्महत्या केली नाही. आता तर दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत असून मंत्रालयातही शेतकरी आत्महत्या करीत असल्याने शिवाजी महाराजांचा शेती विचार जोपर्यंत अंमलात येत नाही, तोपर्यंत शेतकऱयांच्या आत्महत्या देशात होतच राहणार. महाराज शून्य टक्के व्याजाने शेतकऱयांना कर्ज देत होते. त्याचे अनुकरण आताच्या सरकारांनी करण्याची गरज आहे.

स्वागत सकल मराठा समाजांच्या विविध नेत्यांनी एकत्र हार घालून केले. सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले.

Related posts: