|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार 

प्रतिनिधी /तासगाव :

तासगाव तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय युवतीला लग्नाचे अमिष दाखवून  तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच व्यवसायासाठी तिच्याकडून दहा लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील एकाविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. तर तब्बल नऊ वर्षे प्रेमप्रकरणात राहिल्यानंतर ही त्या युवतीला अशा प्रसंगास सामोर जावे लागले आहे. या घटनेने तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तासगाव तालुक्यातील एका गावातील युवतीने तालुक्यातील गव्हाण येथील सुहास सुरेश पाटील यांच्या विरूद्ध तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. तर संबंधित युवती ही अनुसुचित जाती जमातीमधील असल्याने अनुसुचित जाती जमाती कायद्यान्वयेही पाटील याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाब मिळालेली माहिती अशी, संबंधित युवती आणि गव्हाण येथील सुहास पाटील यांची शालेय शिक्षण घेत असतानच 2008-2009 मध्ये ओळख झाली. त्याचे रूपांतर 2009 प्रेमात झाले. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीतही झाले. या प्रेमी युगलाने आपण विवाह करून एकत्र राहू अशा आणा-भाका घेतल्या. सुहासने तिला तुझ्याबरोबर लग्न करेन असे वचन ही दिले होते. यामुळे ती दोघे ही सन 2014 पासून तीन फेब्रुवारी 2018 पर्यंत नोकरी करीत असतानाच एकत्र राहत होते. या कालावधीत हे दोघे ही पुणे, हैद्राबाद, भालकी (कर्नाटक) येथे राहिले. याच कालावधीत सुहासने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार  केला. तसेच लग्नाचे अमिष दाखवून व्यवसायासाठी तिच्याकडून दहा लाख रूपये उकळले असल्याची माहिती उघड झाली. सुहास पाटील यांनी 5 फेब्रुवारी रोजी तासगाव तालुक्यातील एका गावातील दुसऱयाच मुलीशी विवाह केला. ही गोष्ट संबंधित युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी तासगाव पोलिसात त्याच्या विरूद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाटील यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे येथे घडली असल्याने पुणे शहर पोलीस ठाणे येथे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असल्याचे ही पोलिसांनी सांगितले.