|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महापालिकेतील सत्ता व राजकारण

महापालिकेतील सत्ता व राजकारण 

सत्ताधारी शिवसेनेला सत्ता मिळविताना अनेक अडचणी, संकटांना तोंड द्यावे लागले आणि आता सत्तास्थापन केल्यानंतरही ही सत्ता टिकविण्यासाठीही अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. शिवसेनेला सत्तेसाठी समाजकारण व राजकारण दोन्ही करावे लागते.

 

मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेल्या 22 वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता मिळविणे, टिकविणे तसे सोपे नाही. मात्र शिवसेनेने सतत पाचवेळा ही सत्ता मिळवली आणि टिकवली ती केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादामुळेच. आता यावेळी जी सत्ता मिळवली त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखलेली रणनीतीही कारणीभूत आहे. कारण मागील निवडणूक शिवसेनेने ज्या भाजपसोबत युती करून लढवली त्याच भाजपशी विधानसभेप्रमाणेच दोन हात करावे लागले. भाजपनेही पेंद्र व राज्यातील सत्तेचे बाहुबळ वापरले व सेनेला चांगलीच टक्कर दिली, मात्र अखेर सत्तासमीकरणे जुळवून शिवसेनेनेच बाजी मारली आणि महापौरपद व अन्य समित्यांची अध्यक्षपदेही आपल्याच पदरात पाडून घेतली.

मात्र मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आणि महापौरपद थोडक्यात हुकल्याने म्हणजे, स्वत:ला सिंह समजणाऱया भाजपच्या तोंडातील घास वाघाने डरकाळी फोडत काढून घेतल्याने भाजप गप्प कसा बसणार? त्यामुळे भाजपचे नेते मुंबईचे महापौरपद व सत्ता आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आकाशपाताळ एक करीत आहेत. भांडुप येथील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने सेनेच्या उमेदवाराचा पराभव करून पोटनिवडणूक जिंकली आणि भाजपची छाती 56 इंच व अधिक 1 इंचाने वाढली. बस्स, येथेच भाजपच्या एका नेत्याने घोडचूक केली. पूर्व उपनगरातील या नेत्याने मुंबईचा पुढील महापौर भाजपचा असेल, असे उघड आव्हान वाघाला दिले आणि भाजपला जी एक संधी महापौरपद मिळविण्यासाठी मिळाली होती ती या नेत्याने व भाजपनेही गमावली.

कारण, हे आव्हान एका गुजराती नेत्याने, मराठी माणसाला व मराठी माणसांवरील अन्यायाविरोधात लढणाऱया शिवसेनेला दिले आहे, हे आम्हाला सहन झाले नाही, त्यामुळेच आम्ही मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी सेना प्रवेशाप्रसंगी दिले होते. अशा प्रकारे मनसेतील सहा नगरसेवकांनी दिलीप लांडे यांच्या नेतफत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता.

या एका महत्त्वाच्या घडामोडीमुळेच शिवसेनेला पुढील चार वर्षे अच्छे दिन दिसणार आहेत हेसुद्धा तितकेच खरे आहे, मात्र या सर्व प्रक्रियेत मनसेने पालिका आयुक्त व कोंकण आयुक्त यांच्याकडे या सहा नगरसेवकांच्या सेनाप्रवेशाबाबत तक्रार केल्याने व त्यात पहारेकरी यांनीही आपली भूमिका पडद्याआडून निभावल्याने मनसेचे हे सहा नगरसेवक तत्काळ सेनेत अधिकृत प्रवेश करू शकले नाहीत. कोंकण आयुक्तांकडे तारीख पे तारीख पडल्याने व सुनावणी लांबल्याने तब्बल चार महिने हे सहा नगरसेवक ताटकळले आणि कोंकण आयुक्तांची अखेर मान्यता मिळाली. गेल्याच आठवडय़ात पालिका मुख्यालयात शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत  सहा नगरसेवकांना सभागफहात बसवले. या नगरसेवकांच्या सेनाप्रवेशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सभागफहात पेढे वाटले. त्यांच्या पेढय़ांची चव पाहरेकऱयांनीही घेतली हे विशेष.

मात्र आदल्या दिवशी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मातोश्रीवरून आदेश आले व स्थायी समितीवरील ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. दोन सदस्यांचे राजीनामे घेण्यात आल्याने चर्चेला उधाण आले. आता सेनेत नव्याने दाखल नगरसेवकांची स्थायी समितीवर व अन्य समित्यांवर महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागणार, कदाचित त्यांना समित्यांची अध्यक्षपदे दिली जातील तर मग सेनेच्या विद्यमान नगरसेवकांचे विशेषत: जुन्या नगरसेवकांचे म्हणजे ज्यांना विविध समित्यांच्या पदांची अपेक्षा आहे त्यांचे काय व कसे होणार, ही चर्चा  नगरसेवकांच्या मनात होती. पत्रकारांनाही असे वाटले की, ज्या दिलीप लांडे यांनी मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत खेचून आणले व सेनेची सत्ता व महापौरपद पुढील चार वर्षे टिकविण्यास मोलाची मदत केली त्या लांडेमामांना कदाचित स्थायी समिती वा सुधार समितीचे अध्यक्षपद दिले जाईल. तसेच उर्वरित पाच नगरसेवकांचीही कुठल्यातरी चांगल्या समितींवर वर्णी लावली जाईल. मात्र अंदर की बात कुछ औरच असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मातोश्रीवर जेव्हा या सहा नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी, लांडेमामा यांना एका महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली. मात्र लांडेमामा यांनी हात जोडले आणि उद्धवजी यांना सांगितले की, मला आणि माझ्या सहकारी नगरसेवकांना तुमच्याकडून कोणत्याही समितीचे अध्यक्षपद नको. महत्त्वाच्या समित्यांवर वर्णी लागावी अशी अपेक्षाही नाही. आम्ही ज्या समित्यांवर आहोत तेथेच ठेवा. लांडेमामांसोबत जे पाच नगरसेवक सेनेत आले, त्यांनीही मामांवर विश्वास ठेवला. दिलीप लांडे हे आपले भले करतील, ते आपल्याला ‘मामा’ बनविणार नाहीत. त्यांना आपण मोठे करावे, कदाचित हीच त्यांची अपेक्षा असावी. ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली
आहे.

मात्र दुसरीकडे, हे सहा नगरसेवक आता शिवसेनेत गेले असले तर त्यांच्यामागील साडेसाती अद्याप सुटलेली दिसत नाही. कारण, मनसेत 2007 साली नगरसेवकपद भूषवणारे व आता सेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदम यांनी उत्पन्नापेक्षाही 64 टक्के जास्त संपत्ती कमावल्याचा आरोप झाला व एसीबीकडून त्यांची चौकशी लागली. कोंकण आयुक्तांकडील चार महिन्यांचे ग्रहण सुटले व यातून हे सहा नगरसेवक सुटले खरे पण एक नगरसेवक एसीबीच्या रडारवर आला. त्यामुळे सेनेपुढील सत्तेतील अडथळे गेले, अडचणी सुटल्या असे म्हणणे आता धाडसाचे होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला सत्ता मिळविताना अनेक अडचणी, संकटांना तोंड द्यावे लागले आणि आता सत्तास्थापन केल्यानंतरही ही सत्ता टिकविण्यासाठीही अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. शिवसेनेला सत्तेसाठी समाजकारण व राजकारण दोन्ही करावे लागते. बाळासाहेब ठाकरे अनेकदा म्हणत, शिवसेना 80टक्के, समाजकारण, 20 टक्के राजकारण करते. मात्र शिवसेनेला आता त्यांच्यावरील पाहरेकऱयांची दखल घेऊन ताकही फुंकून प्यावे लागत आहे हे खरे.