|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » 3 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

3 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर 

नवी मुंबई / प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेचा सन 2018-19 सालासाठीचा 3 हजार 151 कोटी 93 लाख रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये 3 हजार 150 कोटी 93 लाख रुपये खर्च तर 1 कोटी रुपये शिल्लक दर्शविण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवडय़ात बैठक आयोजित केली आहे.

आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी पाणी पुरवठय़ाच्या दरात सुधारणा करत अप्रत्यक्ष दरवाढ करण्याचे सुतोवाच केले आहे. शहराच्या सुशोभिकरणावर अधिक भर देत सायन्स सेंटर उभारणे, बालोद्यान व सायंटिफिक म्युझियम विकसित करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर केले. शहरातील सर्व मालमत्तांचा लिडार पद्धतीने सर्वेक्षण करून जास्तीत जास्त सर्व मालमत्ता कराच्या जाळ्यात आणून सदर कराद्वारे 575 कोटी रुपये, स्थानिक संस्थाकरातून (एलबीटी) 1 हजार 100 कोटी रुपये, नगररचना विकास शुल्काद्वारे 150 कोटी रुपये, पाण्याच्या दरात सुधारणा करून कमी वापर करणाऱयाला कमी व जादा वापर करणाऱयाना जादा दर आकारून 108 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. त्याच प्रमाणे पेंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांतून 418 कोटी रुपये, रस्ते खोदाई शुल्कातून 41 कोटी रुपये उत्पन्न गफहीत धरण्यात आले आहे. खर्चाच्या बाजूमध्ये एनएमएमटीसाठी 111 कोटी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच रस्ते, फूटपाथ, गटार सुधारणा काँक्रिटीकरण इत्यादीसाठी 306 कोटी रुपये, पाणी पुरवठय़ासाठी 125 कोटी रुपये, मलनिसारणच्या कामासाठी 121 कोटी रुपये, स्मार्टसिटीच्या अनुषंगाने पामबीच मार्गालगत सायकल ट्रक उभारणे व नागरिकांना अडथळामुक्त पदपथासाठी 130 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

आरोग्याच्यादृष्टीने महापालिका रुग्णालयांच्या ठिकाणी जनऔषधी पेंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी उपलब्ध होण्यासाठी पालिकेद्वारे सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्व रुग्णालयात सिटीस्पॅन मशिन व डायलिसीस सुविधा बाह्ययंत्रणेद्वारे पुरविण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनाच्यादृष्टीने मोरबे धरणातून शहरातील 70 टक्के भागात 24 तास पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे उर्वरित भागात व एमआयडीसी क्षेत्रात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यासह इतर कामासाठी 125 कोटी खर्च करण्यात येणार आहे. अमफत मिशन प्रकल्पा अंतर्गत पाणी बचतीसाठी सांडपाण्याचे मायक्रो फिल्टरेशन टेक्नोलॉजिचा वापर करुन 20 दशलक्ष लीटर क्षमतेचे प्रकल्प उभारणी करण्यासाठी 66 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 128 कोटी रुपये खर्चाची कामे झाली असून मार्च अखेर आणखी 400 रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच नगरसेवक निधी 10 लाख व प्रभाग समिती निधी 40 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.