|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कैलास मानसरोवर यात्रेची नोंदणी सुरू

कैलास मानसरोवर यात्रेची नोंदणी सुरू 

नवी दिल्ली :

कैलास मानसरोवर यात्रेची नोंदणी सुरू झाल्याची घोषणा विदेश मंत्रालयाने केली आहे. यात्रेची नोंदणी 23 मार्चपर्यंत करता येणार आहे. हिंदूधर्मीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही यात्रा 8 जून ते 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यात्रेकरता प्रत्येक व्यक्तीला दोन लाख रुपयांचा खर्च येणार असून ही यात्रा 21 दिवसांची असणार आहे. नाथू ला मार्गाने यंदा 50 भाविकांच्या दहा तुकडय़ा पाठविण्याची प्रशासनाची योजना आहे.

नियमानुसार अर्जदार 1 जानेवारी 2018 पर्यंत वयाची किमान 18 वर्षे पूर्ण केलेला आणि कमाल 70 वर्षांपर्यंतचा असावा. विदेश राज्यमंत्र्यांनी संसदेच्या अधिवेशनात याबद्दल माहिती दिली होती. यंदा सिक्कीमच्या नाथू ला खिंडीतून देखील यात्रा करता येणार आहे. मागील वर्षी चीनच्या आक्षेपामुळे हा मार्ग बंद राहिला होता. भारत सरकारने चीनसोबत चर्चा करून पुन्हा एकदा हा मार्ग खुला करण्यास यश मिळविले आहे. याचबरोबर उत्तराखंडच्या लिपुलेख खिंडीतून देखील यात्रा करता येणार आहे. कैलास मानसरोवरसाठी 2015 साली नाथू लाचा मार्ग उपलब्ध झाला होता.