|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईचा निवाडा गोव्याच्याच बाजूने लागणार

म्हादईचा निवाडा गोव्याच्याच बाजूने लागणार 

प्रतिनिधी /पणजी :

म्हादई जलतंटा लवादासमोर मांडण्यात आलेली गोव्याची बाजू भक्कम असून कर्नाटकच्या वकिलांनी घातलेला सावळा गोंधळ कर्नाटकच्या विरोधात जाणार आहे. म्हादईचा निवाडा गोव्याच्याच बाजूने लागणार, असा विश्वास ऍडव्होकेट जनलर दत्तप्रसाद लवंदे यांनी व्यक्त केला आहे.

म्हादई जलतंटा लवादासमोरील सुनावणी संपल्यानंतर ते गुरुवारी गोव्यात आले. यावेळी तरुण भारतशी बोलताना त्यांनी गोवा हा लढा शंभर टक्के जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. सुनावणी पूर्ण झाल्यावर कर्नाटकच्या वरिष्ठ वकिलांनी हस्तांदोलन केले. त्यावेळी तुम्ही बाजी मारलीत असा शेरा मारून त्यांनी आपली हार पत्करल्याचे ऍड. लवंदे यांनी सांगितले. सुनावणी संपली तरी लेखी युक्तिवाद अजून सादर करावयाचे असल्यास त्याच्या प्रति विरूद्ध पक्षाला देऊन लवादासमोर सादर करण्यास लवादाने मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्नाटकच्या वकिलांनी घातलेल्या सावळय़ा गोंधळासंबंधी त्यांना विचारले असता ऍड. लवंदे म्हणाले की, बाजू मांडण्यासाठी कर्नाटकाने वकील उभे केले. सुरुवातीला वरिष्ठ वकील फली नरीमन यांनी पाच वर्षे बाजू मांडली. कर्नाटकचे ऍडव्होकेट जनरल मोहन कतरगी यांनी त्यानंतर बाजू मांडताना ऍड. फली नरीमन यांनी मांडलेले युक्तिवाद खोडून काढण्यास सुरूवात केली. कर्नाटकाच्या युक्तिवादात ताळमेळ बसत नाही. त्यामुळे एकच वकील ठेवावा, युक्तिवाद समजण्यास सोपे जाईल व युक्तिवादांची पुनरावृत्ती होणार नाही. लवादाचा वेळ वाचेल आणि गोंधळही होणार नाही याची कल्पना लवादाने दिली होती.

लवादासमोर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात कायदेशीर बाबी, तांत्रिक बाबी, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून युक्तिवाद असे विविध विभाग आहेत. त्या त्या विभागाचे युक्तिवाद त्या त्या विषयाचे तज्ञ वकील मांडतील, अशी सूचना कर्नाटकने केली आणि ऍड. अशोक देसाई यांना बाजू मांडण्यासाठी लवादासमोर उभे केले.