|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » भागीदारांच्या घोटाळय़ामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

भागीदारांच्या घोटाळय़ामुळे व्यावसायिकाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / पुणे

भागीदारांनी केलेल्या घोटाळय़ामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत द्यायचे या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन भागीदारांसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अरविंद लक्ष्मण फाळके (वय 57) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर शिवाजी जाधव आणि सुनील गोसावी अशी गुन्हा दाखल झालेल्या त्यांच्या भागीदारांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय अरविंद फाळके (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांनी शिवाजी जाधव व सुनील गोसावी यांच्याबरोबर 2011 मध्ये सौदामिनी फायनान्स ही कंपनी हडपसर येथील वैशाली हाईटसमध्ये सुरू केली. त्याबरोबर या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी चीटफंडही सुरू केला. चीटफंड व फायनान्स कंपनीसाठी त्यांनी नातेवाईक व इतरांकडून ठेवी घेतल्या. त्यामध्ये जाधव, गोसावी व अन्य दोघांनी सहा ते आठ कोटी रूपयांचा घोटाळा करून ते पैसे दोघांनी स्वतः साठी वापरले. ऑगस्ट 2016 पासून हा प्रकार सुरू होता. सध्या बँकांची फसवणूक केल्याच्या घोटाळय़ांची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे आता या गुंतवणूकदारांचे पैसे कोठून द्यायचे याबाबत अरविंद वर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला. तसेच त्या चौघांनी त्यांचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यामुळे अरविंद मानसिक दबावात होते. शुक्रवारी ते सौदामिनी फायनान्सच्या कार्यालयात आले. त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला. त्यानंतर त्यांनी मी झोपतो, असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले असता, काही वेळाने साडेतीनच्या सुमारास गोळी झाडल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून कार्यालयातील लोक त्यांच्या केबिनमध्ये धावत गेले. तेव्हा फाळके हे रक्ताच्या थारोळय़ात पडले होते. त्यांनी आपल्याकडील बंदूकीतील गोळी छातीत झाडून घेतली होती. तातडीने त्यांना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांच्या तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

शिवाजी जाधव व सुनील गोसावी हे त्यावेळी एका लग्नासाठी कर्नाटकला गेले होते. त्यांना ही बाब समजल्यावर ते फरार झाले आहेत. अक्षय फाळके यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड पुढील अधिक तपास करीत आहेत.