|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सौदी अरेबिया सुधारणांच्या वाटेवर

सौदी अरेबिया सुधारणांच्या वाटेवर 

रियाध

 महिलांकरता अत्यंत कठोर नियमांसाठी ओळखला जाणारा सौदी अरेबिया सातत्याने महिलांवरील बंधने कमी करत आहे. सौदी अरेबियाच्या शाही शासनाने महिलांना सैन्यात सामील होण्याची अनुमती दिली आहे. याअगोदर महिलांना वाहन चालविणे आणि फूटबॉल सामना पाहण्याची अनुमती मिळाली होती. यानंतर त्यांना पती किंवा नातेवाईकाच्या अनुमतीशिवाय स्वमर्जीने व्यवसाय सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली. सौदी अरेबियाचे युवराज स्वतःच्या 2030 च्या सामाजिक दृष्टीकोन कार्यक्रमांतर्गत महिलांना अशाप्रकारच्या सूट देण्याची घोषणा करत आहेत. या दृष्टीकोनातून सैन्यात सामील होण्याची अनुमती अत्यंत मोठा बदल म्हटला जाऊ शकतो.

आता महिला देखील सैन्यात भरतीसाठी आवेदन करू शकतात असे सौदीच्या जनरल सिक्युरिटी डिव्हिजनने एक विधान प्रसिद्ध करत सांगितले. 12 अटींची पूर्तता करणाऱया महिलांनाच सैन्यात प्रवेश मिळेल असे या विधानात नमूद आहे.

सौदी नागरिकत्वासोबत त्यांचे पूर्ण पालन-पौषण सौदीमध्ये झालेले असावे अशी  अट यात नमूद आहे. याचसोबत सैन्यात सामील होण्यास इच्छुक महिलांचे वय 25-35 वर्षांदरम्यान असण्यासोबतच किमान माध्यमिक शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेची उंची किमान 155 सेंटीमीटर असणे आवश्यक असून तिला वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.

बिगरसौदी नागरिकासोबत विवाह करणाऱया, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी आणि मागील सरकारसोबत काम करणाऱया महिला सैन्यासाठी अर्ज करू शकत नाहीत. सौदीत व्हिजन 2030 तेथील युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी जाहीर केले आहे.

गार्डियनशिप सिस्टीम

-सौदीतील गार्डियनशिप सिस्टीम (पालकत्व व्यवस्था) अत्यंत बळकट आहे. कोणतीही महिला पती, भाऊ किंवा वडिलांच्या अनुमतीशिवाय कोणत्याही सरकारी कागदपत्रावर स्वाक्षरी देखील करू शकत नाही.

-याचबरोबर सौदी अरेबियामध्ये महिलांना एकट्य़ाने प्रवास करणे किंवा कोणत्याही शैक्षणिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी देखील पुरुषाची अनुमती घेणे भाग पडते.

-सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कच्च्या तेलाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. आता तेथील सरकार देशात खासगी क्षेत्राला बळ देऊ इच्छिते, या योजनेत महिलांची भागीदारी वाढविण्याची सरकारची इच्छा आहे.