|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिवसेनेची सत्ताधाऱयांना संधी तर विरोधकांना सुवर्णसंधी

शिवसेनेची सत्ताधाऱयांना संधी तर विरोधकांना सुवर्णसंधी 

स्थायी, परिवहन सभापतीसह पालिकेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी महेश कोठेंची ऑफर

प्रशांत माने/ सोलापूर

महापालिकेचा विस्कटलेला कारभार सुरळीत करुन शहर विकासासाठी भाजपमधील गट नव्हे तर दोन्ही गटांनी एकत्र येत शिवसेनेशी युती केल्यास सत्ताधाऱयांना संधी अथवा काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसपा, माकप या विरोधी पक्षांनी शिवसेनेसोबत एकत्र आल्यास स्थायी, परिवहन सभापतीसह महापालिकेचा कारभार हातात घेण्याची विरोधकांना सुवर्णसंधी असल्याचे सांगत शिवसेनेचे विरोधी पक्षनेता महेश कोठे यांनी सत्ताधारी व विरोधकांसाठी खुली ऑफर दिली आहे.

लोकांनी विश्वासाने सत्ता हाती देवूनही भाजपला पालिकेचा कारभार करता येत नसल्याचे सांगताना सेनेचे विरोधी पक्षनेता कोठे म्हणाले की, सोलापूर शहराचा विकास हेच ध्येय समोर ठेवून शिवसेना सध्या सत्ताधारी भाजपला मदत करीत आहे. असे करण्यात आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. परंतु असे करत असताना पक्षाचे हित पाहणे माझे कर्तव्य आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गणेश वानकर यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. स्थायी सभापती निवडणुकीत काहीही चमत्कार घडू शकतो. त्यामुळे गुरुवारी कोण-कोण अर्ज दाखल करणार त्यानंतरच चमत्काराबद्दल बोलणे योग्य होणार आहे.

भाजपमधील दोन्ही गटांनी आपसातील वाद मिटवून एकत्र येत शिवसेनेशी युती करुन स्थायी सभापतीपद द्यावे आणि पुढील कालावधीसाठी परिवहन किंवा स्थायी अशी संधी द्यावी. सत्ताधारी भाजपला पालिकेचा कारभार सुरळीत चालवून शहराचा गतीने विकास करता येणार आहे. अन्यथा सत्ताधारी भाजपच्या दोन्ही गटातील वाद असाच कायम राहिल्यास शहर विकासाचा बोजवारा उडणार आहे.

सत्ताधारी एकत्र न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसपा, माकप या विरोधी पक्षांना शिवसेनेसोबत एकत्र येण्याची सुवर्णसंधी आहे. सर्व विरोधकांनी एकत्र येत विषय समिती निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का दिला होता. पण राष्ट्रवादीमधील तीन सदस्य फुटले तरी राष्ट्रवादीला एक सभापतीपदी निवडुन आणले होते. सत्ताधाऱयांनी विरोधकांच्या एकीचा धसका घेतल्यामुळे बजेट मांडण्यास त्यांच्याकडून उशीर झाला. पण शहर विकास लक्षात घेवून बजेटसाठी विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेतली. परंतु सभागृहनेता सुरेश पाटील यांच्या अमिषाला काही विरोधी गट बळी पडले. नंतर नगरअ†िभयंता विषयातही तसाच प्रकार घडला. डिपीसीला एकत्र आलो असतो तर विरोधकांना 5 आणि सत्ताधाऱयांना 3 जागांवर समाधान मानावे लागले असते. पण विरोधी काही गट फुटल्यमुळे विरोधकांना 3 जागांवरच समाधान मानावे लागले होते.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसपा, माकप हे विरोधी पक्ष एकत्र आल्यास स्थायी व परिवहन सभापती ही दोन्ही पदे विरोधकांना मिळू शकतात. शिक्षण मंडळ सभापतीपदही भविष्यात विरोधकांना मिळू शकते. झोन समित्यांच्या विषय असलेल्या सर्वसाधारण सभेवेळी आपल्याकडे विरोधी पक्ष आले असते तर निश्चितच सत्ताधाऱयांपेक्षा जास्त झोन विरोधकांकडे राहिले असते. फक्त बसपा वगळता त्यावेळी आपल्याला कोणीच भेटले नाही. 90 दिवसानंतर विषय तसाच गेला असता तर विषय तसाच राहिला असता. त्यामुळे भाजपला सहकार्य करुन शिवसेनेलाही झोन मिळतील आणि शहर विकासाचा गाडा पुढे सरकेल, यासाठीच आपण भूमिका घेतल्याचेही महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे विरोधी पक्षनेता महेश कोठे यांनी सत्ताधारी भाजप आणि इतर विरोधी गटनेत्यांना ऑफर देवून चर्चेचा मार्ग मोकळा केला आहे. सत्ताधारी भाजपमधील दोन देशमुख गट एकत्र येण्याची शक्यता नसल्याने उर्वरित सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची सुवर्णसंधी आहे. परंतु यासाठी विरोधकांमध्ये विश्वासाचा धागा पक्का होणे गरजेचे आहे. सेनेच्या कोठेंनी दोन्हीकडे बाण तर मारला, पण हा बाण नेमका कोणाला लागणार आणि सेनेच्या गळाला कोण लागणार हे शनिवारीच स्पष्ट होणार आहे.

Related posts: