|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » होळी उत्सवाने राज्यात आजपासून शिमगोत्सव

होळी उत्सवाने राज्यात आजपासून शिमगोत्सव 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात आज होळी उत्सवाने शिमगोत्सवाला प्रारंभ होत आहे. संपूर्ण गोव्यात आज दुपारनंतर होळीच्या पारंपरिक ग्रामपातळीवर मिरवणुका निघतील. रात्री उशिरा होळीचा कार्यक्रम होईल तर उद्या शुक्रवारी गोव्यात रंगपंचमीचा कार्यक्रम होईल. राज्य सरकारच्या पर्यटन खात्यामार्फत शनिवार दि. 3 मार्च रोजी फोंडय़ात शिमगोत्सव मिरवणूक होणार आहे.

राज्यात आज सर्वत्र पारंपरिक होळी उत्सव ढोल ताशांच्या गजरात ‘घणचे कटर घण’ या तालवाद्यांत होणार आहे. उत्तर गोव्यातील शिमगोत्सवाला आजच्या होळी उत्सवाने प्रारंभ होईल तर दक्षिण गोव्यातील अनेक भागात गेले काही दिवस चालू असलेल्या शिमगोत्सवाची सांगता आजच्या होळी उत्सवाने होईल. गोव्यात होळीच्या अनेक प्रथा व परंपरा आहेत. कित्येक ठिकाणी एखादे जिवंत झाड मारून ते पानांसह गावात सर्वत्र नाचवत फिरवून नंतर गावातील सीमेवर एक खड्डा काढून त्यात उभारले जाते. कित्येक ठिकाणी एकादे झाड घेऊन ते ढोल ताशांच्या गजरात नाचवत मिरवणुकीने गावातील मंदिरासमोर उभे करून त्याचे दहन केले जाते.

होळी रे होळी पुरणाची पोळी

होळी निमित्त गोडधोड पक्वान करण्याची प्रथा आहे. बहुतेक ठिकाणी हरभऱयाच्या डाळीमध्ये गुळ टाकून शिजवून नंतर त्याची पुरणपोळी केली जाते. त्यातूनच एक म्हण आली ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवून नंतर होळीला दहन करण्याची प्रथा गोव्यात काही भागात आहे. पारंपरिक ढोल, ताशा, आदी वाद्यांसह होळीची मिरवणूक काढून शिमगोत्सवाला प्रारंभ होईल. याचबरोबर गावागावात आजपासून पुढील पाच दिवस पूर्वापार परंपरेनुसार व प्रथेनुसार शिमगोत्सव साजरा केला जाईल.

दरम्यान उद्या शुक्रवारी राज्यात सर्वत्र धूलिंवदन, धूळवड तथा रंगपंचमीचा कार्यक्रम साजरा होईल. राज्यातील ग्रामपातळीवरील शिमगोत्सवातील प्रथा व परंपरेच्या पलिकडे जाऊन उद्या शुक्रवारी देशभराप्रमाणेच गोव्यातही रंगपंचमी थाटात साजरी केली जाईल.

शनिवार 3 मार्च पासून शासकीय शिमगोत्सव

राज्य सरकारच्या पर्यटन खात्यामार्फत राज्यस्तरीय शिमगोत्सव स्पर्धेला शनिवार दि. 3 मार्चपासून फोडा येथून प्रारंभ होत आहे. रोमटामेळ आणि चित्ररथ स्पर्धा, भरगच्च कार्यक्रमानिशी थाटात आयोजित करण्यात आली असून दि. 4 रोजी मडगाव, 6 रोजी सांगे, 7 रोजी वास्को व सांखळी, 8 रोजी वाळपई, 9 रोजी डिचोली, 10 रोजी पणजी, 11 रोजी म्हापसा, 12 रोजी पेडणे, 13 रोजी काणकोण, 14 रोजी केपे, 15 रोजी कुडचडे-सावर्डे, 16 रोजी कुंकळ्ळी, दि. 17 रोजी धाडबांदोडा येथील मिरवणुकीने शिमगोत्सवाची सांगता होईल.

पणजीत रंगरंगोटी, आकर्षक सजावट

शिमगोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पणजीत पर्यटन खात्याने दयानंद बांदोडकर रस्त्यावर भगवे झेंडे, शिमगोत्सवातील घोडेमोडणी, पारंपरिक तरंगे, छत्र, चामर, अब्दागीर वगैरे अनेक प्रतिकृती उभारून शिमगोत्सवाची जोरदार वातावरणनिर्मिती केली आहे. ही रंगरंगोटी सर्वांसाठीच आकर्षण बनली आहे.

Related posts: