|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पोलिसांचे गोपनीय पत्र ‘सिव्हिल’च्या कपाटात

पोलिसांचे गोपनीय पत्र ‘सिव्हिल’च्या कपाटात 

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरण

14 दिवस पत्र क्लार्कच्या कपाटात

अहवाल रखडल्याने कारवाई थांबली

संतप्त पत्रकारांनी विचारला जाब

प्रतिनिधी /रत्नागिरी

ज्ञानदा प्रणव पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांच्याकडे अहवाल मागवणारे शहर पोलीसांचे गोपनीय पत्र तब्बल 14 दिवस शासकीय रूग्णालयाच्या कपाटातच पडून राहील्याचे उघड झाले आहे. 14 फेब्रुवारीला दिलेले हे पत्र 28 फेब्रुवारीपर्यंत काळगी नामक क्लार्कच्या कपाटातच होते. ‘सिव्हिल’च्या या दिरंगाईबाबत संतप्त पत्रकारांनी जाब विचारताच हे पत्र आपल्याला मिळालेच नसल्याने पुढील कार्यवाही करता आली नाही, आता शनिवारपर्यत अहवाल सादर करून अशी सारवासारव डॉ. देवकर यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणांची पुन्हा सखोल चौकशी करावी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे.

पत्रकार प्रणव पोळेकर यांच्या पत्नी ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू पावसकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नर्सिंग होमच्या डॉ. दिपा व डॉ. संजीव पावसकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र काही लोकांच्या दबावाखाली शासकीय रूग्णालय तपास अहवाल तयार करत असल्याचा संशय पत्रकारांना होता. 15 दिवस झाले तरी या संदर्भात पोलीसांना गोपनीय अहवाल सादर झाला नसल्याबाबत व कोणतीच कारवाई होत नसल्याने सर्व पत्रकारांनी बुधवारी सायंकाळी डॉ. देवकर यांची भेट घेतली. यावेळी डॉ. देवकर यांनी पोलीसांकडून आपल्याला पत्रच आले नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. यापूर्वी वारंवार त्यांना या पत्राविषयी स्मरण करून देण्यात आले असतानाही त्यांनी दिलेल्या या उत्तराने पावसकर दाम्पत्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय बळावला.

संतप्त पत्रकारांनी पत्रांचे रजिस्टर पाहण्यास मागितले, मात्र त्या पोलीसांनी पाठविलेल्या पत्राची नोंदच नव्हती. मुळात शहर पोलीसांना 14 फेब्रुवारीलाच हे पत्र पाठविले असून तशी नोंद शहर पोलीसांकडे आहे. त्याचबरोबर ते पत्र घेतल्याची सिव्हीलची पोचही आहे. याबाबत जाब विचारला असता काळगी नामक क्लार्कन हे पत्र नजरचुकीने द्यायचे राहील्याचे सांगितले. तब्बल 14 दिवस हे पत्र क्लार्कच्या कपाटात पडून राहते ही अतिशय गंभीर बाब असून ते जाणीवपूर्व तेथेच ठेवल्याचा आरोप पत्रकारांनी केला. या सर्वामध्ये सिव्हील प्रचंड निष्काळजीपणा दिसून येत आहे.

शनिवारी देणार अहवाल

पत्रकारांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणल्यानंतर येत्या शनिवारी 3 मार्च रोजी हा गोपनीय अहवाल शहर पोलीसांना दुपारी 2 पर्यत सादर केला जाईल असे डॉ. देवकर यांनी सांगितले. प्रसारमाध्यम वारंवार याबाबत पाठपुरावा करीत असतानाही शासकीय रूग्णालय ही बाब किती निष्काळजीपणाने घेते हे यावरून लक्षात आले, मग सर्वसामान्य लोकांचे काय? असाही सवाल उपस्थित करण्यात आला.

पत्रकारांचा उपोषणाचा इशारा

बेजबाबदारपणा दाखवणाऱया काळगीला निलंबित करण्यात यावे अशी मागणी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी निवेदनाव्दारे केली आहे. हे प्रकरण गांभिर्याने हाताळण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. पुन्हा असे प्रकरणे घडू नयेत यासाठी या पावसकर दाम्पत्यांवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे.

Related posts: