|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बसस्थानकावरील पोलिस चौकी बनली पक्षांचे आश्रयस्थान

बसस्थानकावरील पोलिस चौकी बनली पक्षांचे आश्रयस्थान 

 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील मध्यवर्ती बसस्थानकावरील पोलिस चौकी गेली अनेक दिवस पोलिस नसल्याने रिकामीच आहे. तर या ठिकाणी पोलिसांना बसण्यासाठी असणारी खुर्ची व समोरील टेबल यावर पक्षांनी विष्ठा केल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे इचलकरंजी मध्ये शिक्षण, व्यापार व कामांनिमित्त येणार्या प्रवाशांची सुरक्षामात्र रामभरोसे असल्याचे दिसत आहे. या विरोधात प्रवाशांकडून मात्र संतप्त भावना व्यक्त होत आहे.

इचलकरंजी शहर हे सुमारे साडे तीन ते चार लाख लोकसंख्येचे शहर असून येथे दररोज शिक्षण व्यापार व कामाच्या निमित्ताने परिसरातील हजारो नागरिक दररोज ये जा करीत असतात. यापैकी अनेकांना नियमित प्रवासासाठी एस.टी.चा आधार घ्यावा लागतो. पण गेली काही महिने इचलकरंजी येथील बसस्थानकावर पाकिटमारी, महिलांच्या गळ्यातील दागिण्यांची चोरी बॅगा लंपास करणे या सारखे प्रकार वाढत आहेत. या सर्व घटणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानकावर असणारी पोलिस चौकीमात्र नेहमीच पोलिसाविना रिकामी असल्याचे चित्र दिसून येते.

काही दिवसापुर्वी एका प्रवाशाची साडेपाच तोळे सोन्याचे दागिणे असणारी कापडी पिशवी लंपास करण्याचा प्रकार एस.टी.बसमध्ये घडला. दागिणे लंपास झाल्याचा प्रकार त्या प्रवाशाच्य लक्षात येताच त्याने आरडा ओरडा केला. यावेळी उपस्थित इतर प्रवाशांनी संशयास्पद रित्या बसमधून उतरताना एका महिलेस पकडले. पण तिला ताब्यात देण्यासाठी किंवा तिची झडती घेण्यासाठी तेथे पोलिस उपस्थित नव्हते. यावेळी प्रवाशांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फोन केला, असता अर्ध्या तासाने पोलिस दाखल झाले. त्यानंतर त्या महिलेकडून ते दागिणे हस्तगत करण्यात आले. अनेकवेळा प्रवाशांची पाकिटे व किमंती मैल्यवान वस्तू एसटी बसमध्ये गायब झाल्यानंतर ती बस बसस्थानकावरून थेट शिवाजी नगर पोलिस स्टेशनला नेण्याची वेळ चालक व वाहकावर येते. त्यामुळे इतर प्रवाशांचा खोळंबा तर होतोच पण या कालावधीत वस्तु लंपास करणारा चोरटा मात्र, पसार होतानाचे अनुभव सर्वांनाच येतो.

या प्रकारामुळे चोरी व पाकिटमारीच्या अनेक घटना वारंवार घडून सुध्दा फारच थोडय़ा तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत जात असताना दिसून येतात. एरवी पैसे, मोबाईल, मौल्यवान दागिणे गमावलेला प्रवाशी  नशिबाला देष देत, कपाळावर हातमारून घेताना दिसून येत आहे. यामध्ये येथील पोलिस चौकीत मात्र पोलिसा ऐवजी पक्षीच बसल्याचे अनेकवेळा दिसून येते. या पक्षांनी पोलिसाच्या खुर्चीवर व समोरील टेबलवर केलेली विष्ठाही दिवसेंदिवस साफ केली नसल्याचे दिसून येत असल्याने नेमका या चौकीत पोलिस येतो कधी व तेथे बसतो कधी याबाबतच प्रवाशांकडून साशंकता व्यक्त होत आहे.

 

Related posts: