|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपच्या प्रमुख नेत्यांचा पर्रीकरांना पूर्ण पाठिंबा

भाजपच्या प्रमुख नेत्यांचा पर्रीकरांना पूर्ण पाठिंबा 

पर्रीकर घेतील तो निर्णय मान्य करणार

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पाठिशी ठामपणे राहून त्यांना आवश्यक ते सर्व पाठबळ देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मनोहर पर्रीकर हे पक्षाचे मोठे नेते असून आजपर्यंतच्या पक्षाच्या वाटचालीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरी उपाय, देवकार्य अशा सर्वच गोष्टीवर भर देत त्यांच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख नेत्यानी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशीही याबाबत चर्चा झालेली आहे.

भाजपचे ज्येष्ठ व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पक्षाचे पदादाकारी दत्ता खोलकर, खजिनदार संजीव देसाई यांच्यासह अन्य सर्वच प्रमुख नेत्यांनी पर्रीकराना पूर्ण पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. पर्रीकर घेतील तो निर्णय मान्य करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

पर्रीकरांचा निर्णय पक्षाला मान्य असेल

पक्षाचे नेते व गोव्याचे प्रभारी बी. एल. संतोष यानीही गोव्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. पर्रीकर यांना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाणार आहे. त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. अमेरिकेत उपचारासाठी पाठवायचे झाले तरी त्यांच्या इच्छेनुसार पक्ष गोव्याबाबत निर्णय घेणार आहे. पर्रीकर ज्या नेत्यावर जबाबदारी सोपवतील ते पक्षाला मान्य असेल. पक्षीय पातळीवर प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

गोवा भाजपमधील पर्रीकर हे मुख्य नेते आहेत. आजपर्यंत पक्षाच्या यशाच्या कारकीर्दीत पर्रीकरांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्रातील प्रमुख नेत्यांपासून गोव्यातील मुख्य नेत्यांपर्यंत सर्वानीच पर्रीकर घेतील तो निर्णय मान्य करण्याची तयारी ठेवली आहे. येत्या काही दिवसांत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता पक्षीय सुत्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री करतात आवश्यक तेवढेच काम

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या विश्रांती घेण्याबरोबरच आवश्यक व अत्यंत महत्वाचे तेवढेच काम करीत आहेत. मात्र प्रशासनातील दैनंदिन कामाची जाणीव ठेऊन काम सुरु आहे. मागील दोन दिवस मुख्यमंत्र्यानी आवश्यक त्या महत्वाच्या फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत. शिक्षण खात्यासह अन्य काही खात्यांच्या महत्वाच्या फाईल्सना त्यानी मंजूरी दिली आहे.

Related posts: