|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » डोंबिवलीत उसळला कचऱयाचा आगडोंब

डोंबिवलीत उसळला कचऱयाचा आगडोंब 

नेकनीपाडा बस स्टॉप जवळच्या कचऱयाला आग; झाडेही जळून खाक

कल्याण / प्रतिनिधी

आधारवाडी येथील क्षेपणभूमीतील कचऱयाला जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याच्या घटना ताज्या असतानाच डोंबिवलीतही रविवारी संध्याकाळी एमआयडीसीच्या पाईपलाईनलगत असलेल्या कचऱयाला आग लागल्याची घटना घडली. ही आग आटोक्यात आणता आणता अग्निशामक दलाच्या नाकीनऊ आले होते.

आधारवाडी येथील क्षेपणभूमीतील कचऱयाला जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचे पुरेसे पुरावे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हाती आले आहेत. यासंबंधी काही छायाचित्रे महापालिकेच्या हाती आली असून अशा व्यक्तींचा शोध घेता यावा यासाठी पोलीस ठाण्यात यासंबंधीच्या तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांनी सर्वसाधारण सभेत दिली होती. उन्हाळ्यात क्षेपणभूमीवरील कचऱयातून मिथेन वायू तयार होऊन कचऱयाला आग लागण्याचे प्रमाण वाढते, असा दावा यापूर्वी महापालिका अधिकाऱयांकडून करण्यात येत होता. उपायुक्त पवार यांनी कचऱयाला आग लावण्यात येत असल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देताना मिथेन वायूविषयी दावा खोडून काढला होता. हे सर्व घटनाक्रम सुरू असतानाच कल्याण-शीळ रोडला असलेल्या नेकनीपाडा बस स्टॉप जवळच्या कचऱयाला अचानक मोठी आग लागली. त्यामुळे निवासी भागात प्रदूषणयुक्त धूर पसरला होता. आगीची झळ लगतच्या काही झाडांना बसली होती. विशेष म्हणजे एमआयडीसीची पाईपलाईन जवळून जात आहे. आसपासच्या कंपन्यांतील कचरा आणि भंगारवालेदेखील याठिकाणी कचरा आणून टाकतात. मात्र, हा कचरा गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी साचत चालला आहे. कुणीतरी या कचऱयाला आग लावल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

 रहिवासी, विद्यार्थ्यांना धुराचा त्रास

कचरा पेटल्यानंतर परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले. परिसरातील रहिवासी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या धुराचा प्रचंड त्रास होऊ लागला. आगीचे वफत्त कळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

 

Related posts: