|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार

त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार 

प्रतिनिधी/ पणजी

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यात भाजप मित्रपक्षांना भरघोस यश मिळाले असून तेथे एनडीएचे (भाजप-मित्रपक्ष) सरकार स्थापन होईल अशी खात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी वर्तवली आहे. भाजपच्या या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले असून त्याचा ठराव त्यांना पाठवणार असल्याची माहिती दिली.

 म्हादई पाणी वाटपावर श्री. शहा योग्य तो तोडगा काढतील असे सांगून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्रीकर हे दैनंदिन प्रशासकीय काम (फाईल्स) करीत असल्याने मुख्यमंत्री बदलण्याची किंवा त्या पदाचा ताबा दुसऱया मंत्र्यांकडे देण्याची गरज नाही यासंदर्भात काँग्रेसने सल्ले देऊ नयेत असेही श्री. तेंडुलकर यांनी नमूद केले.

29 राज्यांपैकी 21 राज्यात भाजप

पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर यांनी सांगितले की देशातील 29 राज्यांपैकी 21 राज्यात आता भाजपची सत्ता असून केरळ, प. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यातही आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळेल. मोदी व शहा यांचे कर्तृत्त्व व नेतृत्त्व याचा हा परिणाम आहे. लोकांनी भाजपला पाठिंबा दिला असून तिन्ही राज्यातील भाजपच्या यशामुळे हे सिद्ध झाले आहे असे तेंडुलकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारत असून ते निवासातून शासकीय कामकाज हाताळत आहेत. त्यात खंड पडलेला नाही. आणखी काही दिवसांनी ते कार्यालयात येतील आगामी आठवडय़ात ते मंत्रिमंडळ बैठकीसही हजेरी लावतील, असा दावा  तेंडुलकर यांनी केला. मुख्यमंत्री कार्यरत असताना त्यात बदल करण्याचा किंवा ताबा दुसऱयाकडे देण्याचा प्रश्नच नाही असे तेंडुलकर यांनी नमूद पेले. सरचिटणीस सदानंद तानावडे पत्रकार परिषदेला हजर होते.