|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वडजी येथील कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्त्या

वडजी येथील कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्त्या 

प्रतिनिधी/ सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावातील एका शेतकऱयाने कर्जबाजाराला कंटाळून शेतातील विहिरीलगतच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास उघडकीस आली. सुमारे साडेतीन लाख कर्ज असल्यामुळे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केला असल्याचा आरोप सलगर कुटूंबियांनी केला आहे.

राघु रामचंद्र सलगर (वय 55, रा. वडजी, दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे सलगर यांचे तीन एकर शेत आहे. या शेतात सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास राघु सलगर यांनी शेतातील वांगी तोडून पॅरेटमध्ये भरुन ठेवली होती. ही वांगी घेऊन त्यांचा मुलगा सोलापूर यार्डात विकण्यासाठी सकाळी गेला होता. दरम्यान सकाळी 7.30 च्या सुमारास विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी राघु सलगर यांचा पुतण्या गेला असता, त्यांना आत्महत्या केल्याचा प्रकार दिसून आला. विहिरीशेजारील एका झाडाला गळफास घेऊन राघु सलगर यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना माहिती कळवली. तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र तलाठी व महसूल अधिकाऱयांना कळवूनही सायंकाळपर्यंत तरी ते घटनास्थळी आले नसल्याचे सलगर कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

शेतकरी राघु सलगर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मुली व मुलाचा विवाह झाला आहे. दरम्यान मागील वर्षी तीन एकर शेतामध्ये टोमॅटो लावले होते. टोमॅटोचे भाव उतरल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यातच कासेगाव सोसायटी, पतसंस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून असे एकूण साडेतीन लाखाचे कर्ज काढले होते. कर्जाच्या वसुलीसाठी सोसायटीकडून तगादा लावण्यात येत होता. तत्पूर्वी शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन दोन वेळा सलगर यांनी अर्ज केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. अखेर शेतातीलच एका झाडास गळफास घेउढन शेतकरी राघु सलगर यांनी जगाचा निरोप घेतला. सिव्हिल पोलीस चौकीत या प्रकरणी नोंद झाली आहे.

सहकार खात्याच्या गलथान कारभाराचा बळी

राघू सलगर यांनी राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी दोन वेळा अर्ज केला होता. मात्र कर्जमाफी मिळाली नाही. सोसायटी, पतसंस्था व जिल्हा बँके अंतर्गत एकूण साडेतीन लाखाचे कर्ज आहे. कर्जमाफी वेळेत मिळाली असती तर आधार मिळाला असता, सहकार खात्याच्या गलथान कारभारामुळे वडिलाचा बळी गेला आहे. असा आरोप राघु सलगर यांचा मुलगा बिरु यांनी केला आहे. आता तरी शासनाला जाग यावी व कर्जमाफीसाठी कारवाई व्हावी अशी मागणी सलगर कुटुंबियांनी केली आहे.

Related posts: