|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी शिवाजी चौकात निदर्शने

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी शिवाजी चौकात निदर्शने 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत, या प्रमुख मागणीसाठी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव समितीच्यावतीने सोमवारी शिवाजी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हटाओ, हटाओ- पुजारी हटाओ आदे घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

गेल्या काही महिन्यांपासून श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव समितीच्यावतीने अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावण्यात यावेत, यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अंबाबाई भक्तांचाही समावेश आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव समितीला अंबाबाई मंदिरात कोणत्याही परिस्थितीत पगारी पुजारी नेमण्यात येईल. तसेच याबाबत वटहुकूम सुध्दा काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत पुजारी हटाव समितीचे आंदोलक सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकात जमले. यानंतर प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र निदर्शने केली. यावेळी अंबाबाईच्या नावानं चांगभल, अंबाबाई आमच्या हक्काचे – नाही कुणाच्या बापाचे, हटाओ, हटाओ- पुजारी हटाओ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

आंदोलकांनी सांगितले की, मंदिर किंवा मंदिर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी व मंदिरातील शांतता भंग होवू नये, यासाठी संयमाने रस्त्यावर उतरून ही लढाई सुरू आहे. आमची मागणी मान्य होईतोपर्यंत हा लढा समिती असाच सुरू ठेवणार आहोत. आमची मागणी मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असाही इशारा याप्रसंगी देण्यात आला.

या आंदोलनात ऍड. चारूलत्ता चव्हाण, राजेश लाटकर, अनिल कदम, जहिदा मुजावर, रेहाना नागरगट्टी, आर. के. पवार, बाबा पार्टे, इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, सुरेश साळोखे, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, तानाजी आंग्रे, विराज पाटील, अवधूत साळोखे, राजू यादव, विनायक फाळके, दिलीप देसाई, शशी बिडकर आदींनी सहभाग नोंदवला होता.

तामिळनाडुतील मंदिरात देवीला पुजाऱयांकरवी सलवार कमीजचे वस्त्र

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू येथील मयुरानाथस्वामी मंदिरातील एका पुजाऱयाने एका देवीच्या मूर्तीला सलवार कमीज हे वस्त्र परिधान केले होते. या कारणास्तव या मंदिरातून संबंधित पुजाऱयासह त्याच्या वडिलांना पदावरून हटवण्यात आले आहे, याबाबत सोशल मिडियावर प्रसिध्द झालेले वृत्त एका पत्रकाद्वारे आंदोलकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहितीसाठी वितरित केले. सहा महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी संबंधित पुजारी मयुरानाथस्वामी मंदिरात रूजू झाला होता. त्याने या मंदिरातील देवीच्या मूर्तीला सलवार कमीज हे वस्त्र परिधान करून त्याचे छायाचित्र टिपले आणि ते व्हाटस ऍपवर पाठवले होते. त्यामुळे संबंधित पुजारी व वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हा संदर्भ देवून काही महिन्यांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली असे वस्त्र परिधान करणाऱया पुजाऱयांवरही अशाच पध्दतीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी याप्रसंगी केली.