|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अण्णा हजारेंच्या लढय़ात आटपाडीची सुकन्या अग्रभागी

अण्णा हजारेंच्या लढय़ात आटपाडीची सुकन्या अग्रभागी 

प्रतिनिधी/ आटपाडी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा शेती आणि शेतकऱयांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत 23मार्च 2018पासून दिल्लीत बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या लढय़ाच्या तयारीचा श्रीगणेशा त्यांनी आटपाडीच्या सभेतून केला. या लढय़ाच्या निमित्ताने आण्णा हजारे यांना आटपाडीत निमंत्रीत करणाऱया कल्पना इनामदार यांची दिल्ली आंदोलनाच्या कोअर कमिटीत निवड करण्यात आली असून यानिमित्ताने अण्णा हजारेंच्या लढय़ात आटपाडीच्या सुकन्या अग्रभागी आहे.

समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशात केंद्र सरकार व केंद्रीय कृषिमुल्य आयोग शेतकऱयांच्या हिताबाबत व शेतमालाच्या दराबाबत कृती करत नसल्याची खंत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवुन लढय़ाची भुमिका स्पष्ट केली आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला दर मिळण्याची गरज आहे. त्यासाठी विविध पातळीवर आंदोलनेही झाली आहेत. कृषिप्रधान देशातच शेतकऱयांचे हाल होत असून या घटनेचा निषेध व्यक्त करत अण्णा हजारे यांनी देशातील शेतकऱयांच्या प्रश्नासाठी दिल्ली येथे शहीद दिनापासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन यापुर्वीच जाहीर करून त्याअनुषंगाने देशभर सक्रिय सभांव्दारे वातावरण निर्मीती केली आहे.

दिल्लीत होणाऱया सत्याग्रह आंदोलनाच्या तयारीची पहिली सभा सांगली जिल्हय़ातील आटपाडीमध्ये झाली. आटपाडी तालुक्याच्या सुकन्या व मुंबई येथे वास्तव्यास राहुन विविध चळवळींमध्ये सक्रिय असणाऱया कल्पना इनामदार यांनी अण्णा हजारे यांना आटपाडीत निमंत्रीत करून वातावरण निर्मीती केली. शेतकऱयांच्या प्रश्नांसह लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती, शेतकऱयांच्या समस्या, शेतमालाला हमीभाव, वीज व पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणे, शेतकऱयांना 5हजार पेन्शन द्यावी, निवडणुकांमध्ये सुधारणा करणे, स्वामीनाथन आयोग लागु करावा यासह अन्य प्रश्नांसाठी अण्णा हजारे यांनी लोकांना आवाहन करत हा लढा जनतेने हाती घेतल्याचे सांगत महाराष्ट्रासह देशभरातील जनतेला आंदोलनासाठी हाक दिली आहे.

या आंदोलनासाठी कार्यकर्ता म्हणून सक्रिय होणाऱयांकडून कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत राहुन निवडणुक लढविणार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र भरून घेण्यात आले आहे. असे हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत आहेत. हा लढा यशस्वी करण्यासाठी दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय पातळीवरील कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विविध राज्यातील पहिल्या फळीतील मंडळींचा सहभाग असून अशा वीस जणांच्या कोअर कमिटीमध्ये कल्पना इनामदार यांचा समावेश आहे. त्यामुळे आटपाडीची सुकन्या ऐतिहासिक महत्त्व असणाऱया दिल्लीतील लढय़ाच्या व्यासपीठावर अग्रभागी राहणार असल्याने त्यांची सक्रियता पुन्हा चर्चेत आली आहे.

लक्षवेधी सक्रियता आणि चर्चा

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या व्यासपीठावर सक्रिय असलेल्या कल्पना इनामदार यांनी यापुर्वी आटपाडीमध्ये टेंभुसह विविध प्रश्नांवर सक्रिय आंदोलने करून सर्वांचे लक्ष वेधले. एका महिलेने विविध लढय़ातून सर्वांचेच लक्ष वेधल्याने त्यांचे लढे चर्चेत राहिले. पुणतांबे येथील शेतकऱयांच्या लढय़ातील त्यांचा सहभाग लक्षवेधी होती. नाशिक येथे शेतकरी लढय़ानंतरच्या कोअर कमिटी बैठकीतील भुमिकेवर आक्षेप घेतल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आला. आत्ता अण्णा हजारेंच्या लढय़ातील सक्रियता वाढवत त्यांनी शेतकऱयांच्या प्रश्नासाठी विठलापुर ते दिल्ली असा प्रवास करून लक्षवेधण्याचे काम कल्पना इनामदार यांनी केले आहे.