|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लोकायुक्तांच्या हत्येचा प्रयत्न

लोकायुक्तांच्या हत्येचा प्रयत्न 

न्या. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर चाकूहल्ला : बेंगळूरच्या मल्ल्या इस्पितळात दाखल, आरोपीला अटक

प्रतिनिधी / बेंगळूर

भ्रष्टाचारामुळे कोलमडलेल्या कर्नाटक लोकायुक्त संस्थेला पुन्हा सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच लोकायुक्त न्यायमूर्ती विश्वनाथ शेट्टी यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी दुपारी बेंगळूरमधील लोकायुक्त कार्यालयातच ही घटना घडली. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर चाकूने वर्मी घाव घालण्यात आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर बेंगळूरच्या मल्ल्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.

मूळचा राजस्थान येथील असलेला तेजराज शर्मा नामक युवक बुधवारी दुपारी 12.45 वाजता बेंगळुरातील लोकायुक्त कार्यालयात आला. यावेळी त्याने न्यायमूर्ती विश्वनाथ शेट्टी यांच्याशी हुज्जत घालत आपण दिलेल्या तक्रारीची का दखल घेतली नाही? पुरेसे पुरावे सादर करूनही आपल्याला न्याय का दिला नाही, असे प्रश्न उपस्थित करून चाकूने पोटावर आणि छातीवर तीन वार केले. रक्ताने माखलेल्या चाकूसह तो कार्यालय बाहेर येताच तेथील कर्मचाऱयांमध्ये घबराट पसरली. त्याने तेथील कर्मचाऱयांवरही चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरीही धाडस दाखवत त्यांनी तेजराज शर्माला पकडून विधानसौध पोलिसांच्या स्वाधीन केले.

हल्लेखोर तेजराम शर्मा याने तुमकूर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वासंती उप्पार आणि बालमंदिरातील गैरव्यवहारासबंधी तक्रार दाखल केली होती. सदर अर्ज लोकायुक्त न्यायालयाने फेटाळला होता. या अर्जासंबंधी माहिती घेण्यासाठी तो बुधवारी दुपारी लोकायुक्तांच्या भेटीसाठी आला. येथील रजिस्टर बुकमध्ये नाव आणि सही केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्या. विश्वनाथ शेट्टी यांची भेट घेण्यास परवानगी दिली होती. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. लोकायुक्तांवर जीवघेणा हल्ला होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

तेजराज हा तुमकूर जिल्हय़ाच्या तिपटूर येथे काही साहित्योपकरणांचे दुकान चालवत होता. शासकीय कंत्राट मिळविण्यासाठी त्याने अर्ज सादर केला होता. मात्र कंत्राट न मिळाल्याने तो संतप्त झाला होता. या संतापाच्या भरातच त्याने हे कृत्य केल्याची शंका व्यक्त होत आहे.

अनेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या

तुमकूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक मंजुनाथ, शिक्षण खात्याचे प्रथम श्रेणी अधिकारी शिवकुमार, कोलार जिल्हा रेशीम कोष बाजारपेठचे साहाय्यक संचालक देवराय, तुमकूर जिल्हा टीयुएमपी लि. चे व्यवस्थापक डॉ. रामचंद्रप्पा व कारकून महालिंगप्पा, व्यवस्थापक ए. आर. चंद्रशेखर, बेंगळूरच्या विनिमय केंद्राचे संचालक प्रभाकर आणि तुमकूर जिल्हा वाणिज्य-औद्योगिक खात्याचे प्रथमश्रेणी अधिकारी कुमार यांच्याविरुद्ध तेजराजने यापूर्वे लोकायुक्त संस्थेत तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र त्या फेटाळण्यात आल्या होत्या.

 

सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष

लोकायुक्त कार्यालयातील सुरक्षेकडे मागील दोन-तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱयांनी सरकारकडे माहिती दिली होती. तरी सुद्धा त्याकडे कानाडोळा झाला आहे. येथील मेटल डिटेक्टर मशीन नादुरुस्त आहे, असे सांगण्यात येते.

 हल्ल्याची घटना घडल्यानंतर सरकार निदेतून खडबडून जागे झाले आहे. कोणत्याही शासकीय भेट घेण्यासाठी येणाऱयाची कसून चौकशी करण्यात येते. त्याकरिता कार्यालयाबाहेर मेटल स्कॅनरची बसविण्यात येते. मात्र येथील तपासणी यंत्र नादुरुस्त होते. ती दुरुस्ती करण्याची तसदी कोणीही घेतली नाही. त्यामुळे तेजराजला चाकूसह कार्यालयात प्रवेश करणे शक्य झाले.

मुख्यमंत्र्यांची इस्पितळाला भेट

हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मल्ल्या इस्पितळाला भेट देऊन न्या. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांशी चर्चा करून आरोग्याविषयी विचारपूस केली. त्यानंतर तेथेच लोकायुक्त कार्यालयातील अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावून घटेनेची माहिती घेतली.

संपप्त पडसाद

लोकायुक्त न्यायमूर्ती विश्वनाथ शेट्टी यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद उमटले असून अनेकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनी लोकायुक्त कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था योग्य नसल्याचे म्हटले आहे. उपलोकायुक्त सुभाष आडी यांनी सरकारच्या कार्यपद्धती विषयी नाराजी व्यक्त केली असून अधिकाऱयांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.