|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिला इशारा

ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिला इशारा 

कोलकाता :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनजीं यांनी रालोआतील मतभेदांप्रकरणी गुरुवारी भाजपवर शरसंधान केले. तेलगू देसम पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बंड पुकारल्याचा दावा त्यांनी केला. आज टीडीपी त्यांची साथ सोडत असून भविष्यात आणखीन काही जण वेगळी वाट पकडू शकतात. उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानातील चित्र भाजपने अभ्यासावे, बंगालच्या दिशेने वाटचाल करण्याचे धाडस करू नका, अन्यथा बंगालमधून चोख प्रत्युत्तर मिळेल असा इशारा ममतांनी दिला.

बंगालला जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे भाजपचे नेते म्हणत आहेत. परंतु हे सोपे नाही, याच्या जागी बंगाल मात्र दिल्ली जिंकू शकतो. जर तुम्ही बंगालला लक्ष्य कराल, तर बंगाल दिल्लीतील लाल किल्ल्याचे लक्ष्य बाळगेल. बंगाल पूर्ण देशासाठी काम करत असल्याचे याद राखा असे ममतांनी भाजपला उद्देशून म्हटले. भाजप आणि टीडीपीतील संबंध बिघडत चालले असून ममता बॅनर्जी तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दिशेने अनेक प्रादेशिक पक्षांच्या संपर्कात आहेत. मागील आठवडय़ात ममतांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केली होती.