|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात राज्यस्तरीय महिलादिनी शानदार समारंभ

साताऱयात राज्यस्तरीय महिलादिनी शानदार समारंभ 

प्रतिनिधी /सातारा :

समाजामध्ये महिलांना म्हणावे तेवढे स्थान नाही, हे बदलण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलींना चांगले शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन आर्थिक दृष्टय़ा सक्षम केले पाहिजे तर समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.

महिलांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन आज जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी अस्मिता योजनेचा शुभारंभही मान्यववरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, पिस्तुल नेमबाज राही सरनोबत, जलतरण पट्टू स्नेहल कदम, रायफल नेमबाज रुचिरा लावंड, सिने अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, किर्ती नलावडे, रेवती शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

 महिलांचे आर्थिक, शैक्षणिक व राजनैतिक सक्षमीकरण झाले पाहिजे. यासाठी महिलांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क करावा.  शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जाईल. महिलांमध्ये राजनैतिक सक्षमीकरणाचीही गरज आहे. यासाठी महिलांनी आपल्या नेतृत्वगुणांना वाव दिला पाहिजे तसेच मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. शहरातल्या महिला जास्त करुन शिक्षीत असतात पण त्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचे प्रमाण कमी आहे. आता  शहरातल्या महिला मतदारांनीही मतदान प्रक्रियेत मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवावा. महाराष्ट्रामध्ये महिलांच्या लोकसंख्येच्या 925 प्रमाणात प्रत्यक्ष, महिला मतदाराच्या संख्येचे प्रमाण 905 इतकेच आहे.  ही 20 महिला मतदारांची तफावत दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांना मतदानच हक्क जन्मजात मिळाला आहे. जिह्यातील जास्तीत जास्त महिलांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून   समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.

Related posts: