|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आर्थिक तडजोड करून मद्यधुंद शिक्षकाला ‘अभय’

आर्थिक तडजोड करून मद्यधुंद शिक्षकाला ‘अभय’ 

प्रतिनिधी/ सांगली

शिक्षण हे पवित्र कार्य करत असताना वाळवा तालुक्यातील एका शाळेत मद्यपान करून आलेला शिक्षक सापडला. तोही प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्या तपासणीवेळी. पण या शिक्षकावर कोणतीही कारवाई न करता संबंधित  शिक्षकाशी आर्थिक तडजोड करून जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.  शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुनील फराटे यांनी याबाबत जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे  तक्रार केली आहे.  त्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण, यामध्ये शिक्षणाधिकारी वाघमोडे यांना मात्र क्लिन चिट दिली असल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी सौ. वाघमोडे या शाळा तपासणीसाठी वाळवा तालुक्यात गेल्या होत्या. त्यावेळी वाळवा केंद्रामध्ये एका जिल्हा परिषद शाळेस भेट दिली असता एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत सापडला. मात्र सौ. वाघमोडे यांनी त्याबाबत संबधित शिक्षकावर कारवाई न करता आर्थिक तडजोड केली.

शिक्षणाधिकारी वाघमोडे यांच्या कामाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामध्ये ही गंभीर तक्रार फराटे यांनी केली आहे.  त्या शिक्षक मान्यता, संच मान्यता, शिक्षक बदली अशा सर्वच कामासाठी पैसे घेतात. या संदर्भात त्यांच्या अनेक तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत, असा थेट आरोप त्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. खाजगी स्पर्धा परिक्षा न घेण्याचा शासन निर्णय असतानाही खाजगी स्पर्धा परिक्षांना आयोजनाची सुट दिली जाते. यामध्येही आर्थिक तडजोड केली जाते असा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एका शाळेत अशा खाजगी स्पर्धा परिक्षा शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर रोखण्यात आल्या आहेत.  प्रभारी शिक्षणाधिकारी असताना शिक्षक भरतीस बंदी असतानाही रोस्टर डावलुन अनेक शिक्षकांची भरती केली आहे. लोंढे भरती प्रकरणी लोंढे यांना निलंबित करून चौकशी करण्यात आली मग सौ. वाघमोडे यांच्याबाबतच वेगळा न्याय का त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पोलिसात तक्रार करणार : सौ. वाघमोडे

फराटे यांनी केलेली तक्रार आणि आरोप पूर्णपणे खोटा व चुकीचा आहे. कोणतीही शहानिशा न करता फराटे वेळोवेळी चुकीचे व काहीही आरोप करीत असतात. चुकीच्या तक्रारी देतात. हे योग्य नाही. संबंधित शाळेत आम्ही गेलो असता संबधित शिक्षक दारू प्यायलेला नव्हता. त्यांना गोळ्या सुरू होत्या. त्यामुळे आपल्याबाबत चुकीची माहिती देणाऱया फराटे यांच्याविरोधात आपण पोलीसात तक्रार करणार असल्याचे शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी सांगितले.

शिक्षकास निलंबनाची नोटीस

वाळवा तालुक्यातील शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी भेट दिलेल्या  त्या शाळेतील संबंधित शिक्षकास निलंबनाची नोटीस देण्यात आली असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. शिक्षणाधिकारी मात्र असा प्रकार झालाच नाही असे सांगत आहेत.

Related posts: