|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » तामिळनाडूत वणव्याने घेतले 9 बळी

तामिळनाडूत वणव्याने घेतले 9 बळी 

ट्रेकिंग करण्यास गेलेले 36 जण जंगलात अडकले : 27 जणांना वाचविण्यात यश

वृत्तसंस्था/  चेन्नई

तामिळनाडूतील थेनी जिल्हय़ाच्या कुरंगनी टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेलेला समूह वणव्याच्या तावडीत सापडला आहे. जंगलात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी चार हेलिकॉप्टर्स समवेत 16 गरुड कमांडो शोधमोहीम राबवत आहेत. कुरंगनी टेकडीवर 36 जणांचा समूह शनिवारी ट्रेकिंगसाठी गेला होता. रविवारी जंगलाला आग लागल्याने हा समूह संकटात सापडला. उपलब्ध माहितीनुसार 4 महिला, एक मुलासमवेत 9 जणांचा मृत्यू झाला. तर 27 जणांना वाचविण्यास यश आले असून यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे.

या समूहात 12 विद्यार्थी कोईम्बतूर समवेत इरोड जिल्हय़ातील असून 24 जण चेन्नईच्या एका ट्रेकिंग पथकाचे सभासद आहेत. यात 25 महिला, तीन मुले आणि 8 पुरुषांचा सहभाग होता. हे सर्वजण शनिवारी कुरुंगनीच्या जंगलात ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी ते आगीत सापडले. अग्निशमन दलाला दुपारी 3 वाजता आगीची माहिती मिळाली होती, असे जिल्हाधिकाली पल्लवी बलदेव यांनी सांगितले.

दुर्गम भाग

बचावपथकासोबत तामिळनाडूचे अग्निमशन विभाग, पोलीस आणि वन विभागाचे पथक टेकडीच्या वर बचावमोहिमेसाठी पोहोचले. या दुर्गम भागात वाहने नेता येत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पथकाने अनेक जखमींना उचलून खाली आणले आहे. रविवारी रात्री दाट काळोखामुळे बचावमोहीम थांबविण्यात आली होती.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिली माहिती

टेकिंगदरम्यान जंगलातील आगीत अडकलेल्या एका विद्यार्थ्याने स्वतःच्या वडिलांना फोन करत संकटाची माहिती दिली होती. त्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी  वनविभागाला याची माहिती दिल्याने वेळीच बचावकार्य सुरू करणे शक्य झाले. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी वन विभागाने देखील स्वतःचे 40 कर्मचारी पाठविले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 रुग्णवाहिका जंगलक्षेत्रात पाठविण्यात आल्या आहेत. गंभीर जखमींना चांगल्या उपचारासाठी मदुराईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

संरक्षणमंत्र्यांनी पाठविली मदत

दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे वायूदलाची मदत मागितली होती. सीतारामन यांनी ट्विट करत याची माहिती दिली. वायूदलाला विद्यार्थ्यांची मदत करणे आणि त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपण सातत्याने थेनी जिल्हाधिकाऱयांच्या संपर्कात असून आगीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: