|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा प्रभाग रचना प्रारूप आराखडय़ाला आज मान्यता

मनपा प्रभाग रचना प्रारूप आराखडय़ाला आज मान्यता 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाकडे पाठविलेल्या प्रारूप आराखडयाला राज्य निवडणूक आयोगाकडून आज मान्यता दिली जाणार आहे. दरम्यान आराखडयाची धास्ती नगरसेवकांसह इच्छूकानीं घेतली असून 20 मार्च रोजीच नेमका कोणता भाग कुठे जोडला हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करून मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे दिला आहे. या आराखडयामध्ये किरोकळ त्रुटी होत्या त्या दुरूस्त करून देण्यात आल्या आहेत. या आराखडयाला मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता दिली जाणार आहे. यानंतर एक दोन दिवसात हा आराखडा मनपाकडे पाठविला जाणार आहे. मात्र अत्यंत गुप्तपणे याचे कामकाज सुरू आहे. आराखडा 20 रोजीच प्रसिध्द केले जाणार असून तोपर्यंत आराखडयाची माहिती कोणालाही समजणार नाही याची दक्षता मनपाच्या अधिकाऱयांनी घेतली आहे.

या आराखडयाची धास्ती नगरसेवकांसह इच्छूकांनी घेतली असून याचीच चर्चा सुरू मनपात सुरू आहे. निवडणूक आयोगोच्या कार्यक्रमानुसार दि 17 मार्च रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला प्रवर्गासाठी सोडत काढण्यासाठीची नोटीस प्रसिध्द केली जाणार आहे. यानंतर 23 रोजी प्रभाग रचनेची अधिसुचना, या दिवसापासून दि सहा एप्रिल पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागविण्यात येणार आहेत. दि 16 एप्रिल रोजी हरकती आणि सुचनांवर सुनावणी होणार आहे. 27 रोजी यावर निर्णय तर दोन मेला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान सुरू असलेल्या चर्चेनुसार 2013 च्या लोकसंख्येनुसार प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षित प्रभाग निश्चित करताना त्यातील एक प्रभाग सरासरी 20 ते 22 हजार इतक्या मतदारांचा करण्यात आला आहे. मनपाक्षेत्राची मतदार संख्या पाच लाख चार हजाराच्या आसपास आहे. यानुसार 78 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग तयार करण्यात आले असून सांगलीवाडी हा भाग पूर्वीप्रमाणेच तीन नगरसेवकांचा ठेवल्याची चर्चा आहे. तर मिरजेतील एक प्रभाग पाच नगरसेवकांचा तर राहिलेले 18 प्रभाग चार नगररसेवकांचे केल्याची चर्चा आहे. 40 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी आहेत. 11 सदस्य अनु. जाती आणि 29 सदस्य नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहेत. तर महिलांसाठी सर्वच प्रभागात 50 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

नगरसेवकांनाही प्रभाग फोडाफोडीचा फटका बसणार असल्याने त्यांनीही धास्ती घेतली आहे. प्रथमच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येणार असल्याने प्रभाग मोठे झाले आहेत.  मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाली होणार आहेत.

Related posts: