|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फिनलंड सर्वाधिक सुखी लोकांचा देश

फिनलंड सर्वाधिक सुखी लोकांचा देश 

रोम :

संयुक्त राष्ट्राच्या एका नव्या अहवालानुसार फिनलंड जगातील सर्वाधिक सुखी देश ठरला आहे. तर दुसरीकडे समस्यांना तोंड देणारे बुरुंडीच्या नागरिकांमध्ये सर्वाधिक असंतोष आहे. सर्वाधिक आनंदी प्रवासी देखील फिनलंडमध्येच असल्याचे अध्ययनात आढळून आले आहे. मागील काही वर्षांमध्ये आर्थिक सुबत्तेसोबतच जनतेतील धारणा देखील महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. यानुसार अनेक देशांनी हॅप्पीनेस निर्देशांकाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

 156 देशांच्या यादीत फिनलंड मागील वर्षी 5 व्या स्थानावर होता. या यादीत भारत स्वतःचे शेजारी चीन, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश आणि हिंसाचारग्रस्त म्यानमारपेक्षाही मागे आहे.

आघाडीचे 10 देश

यादीत पहिल्या स्थानावर फिनलंड असून त्याच्यानंतर नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्वीत्झर्लंड, नेदरलंड, कॅनडा, न्युझीलंड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्रम लागतो.

भारत पिछाडीवर

दक्षिण आशियाचा विचार केल्यास पाकिस्तानचे लोक सर्वाधिक आनंदी असल्याचे अहवालात नमूद असून ही बाब हैराण करणारी आहे. यादीत पाकिस्तान 75 व्या स्थानावर आहे. यानंतर चीन (86), भूतान (97), नेपाळ (101), बांगलादेश (115), श्रीलंका (116), म्यानमार (130), भारत (133) आणि अफगाणिस्तान (145) यांना स्थान मिळाले.

अमेरिकेचे स्थान

या यादीत अमेरिकेचे स्थान घसरले आहे. मागील वर्षी अमेरिकेला 14 वे स्थान मिळाले होते, परंतु यंदाच्या यादीत 18 व्या स्थानावर अमेरिकेला समाधान मानावे लागले आहे.

प्रवासी सुखी असलेला देश

प्रवासी सुखी राहण्याप्रकरणी देखील फिनलंड पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, आइसलंड, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, स्वीत्झर्लंड आणि मेक्सिको यांचा क्रम लागतो. फिनलंडची एकूण लोकसंख्या 55 लाख असून यातील 3 लाख प्रवासी (स्थलांतरित) आहेत.

पिछाडीवरील देश

यादीत मागील 7 वर्षांपासून युद्धाला तोंड देणारा सीरिया 150 व्या स्थानावर आहे. यानंत रवांडा (151), येमेन (152), टांझानिया (153), दक्षिण सुदान (154), मध्य आफ्रिकन गणराज्य (155) आणि सर्वात तळाला बुरुंडी (156) देशाला स्थान मिळाले.