|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिह्यात जिताडा, ‘मड क्राब’चे होणार भरघोस उत्पादन

जिह्यात जिताडा, ‘मड क्राब’चे होणार भरघोस उत्पादन 

बीजवाढीसाठी मत्स्य खात्याचे चार पडीक तलाव वनविभागाकडे,

‘मर्ड क्राब’चे बीज चेन्नईतून आणणार, जिह्यातील किनाऱयावरील चौदा गावांत मत्स्यशेती

 

राजेंद्र शिंदे /चिपळूण

शासकीय कांदळवनांचे संरक्षण करून उपजीविकेची साधने उपलब्ध करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या योजनेंतर्गत जिह्यातील किनारपट्टी भागातील चौदा गावांमध्ये मत्स्यशेती केली जाणार आहे. यामध्ये जिताडा, कालवे, शिंपल्यांसह शोभिवंत मत्स्यशेतीचा समावेश आहे. मड क्राबचे (खेकडा) बीज वाढवण्यासाठी रत्नागिरीतील मत्स्यखात्याचे 4 तलाव ताब्यात घण्यात आले असून चेन्नईतून बीज आणले जाणार आहे.

कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेसाठी चिपळूण तालुक्यातील दोणवली, गांग्रई, चिवेली व गुहागर तालुक्यातील पेवे, तवसाळ या खाडी व किनारा भागातील गावासह जिह्यातील एकूण 14 गावे निवडण्यात आली आहेत. या गावातील कांदळवनासह अन्य परिसरात मड क्राब प्रकल्प साकारण्यासाठी वनविभागाने रत्नागिरीतील मत्स्य खात्याचे चार तलाव घेतले आहेत. यामध्ये चेन्नई येथून बीज आणले जाणार आहे. ते प्रथम सिंधुदुर्गतील हॅचरीजमध्ये ठेवून नंतर रत्नागिरीत तलावात सोडले जाणार आहेत. साधारणपणे शंभर ग्रॅमपर्यंत त्यांचे वजन झाल्यानंतर ते या गावात होणाऱया प्रकल्पासाठी दिले जाणार आहेत. मड क्राब हा साधारणपणे एक ते दीड किलो इतक्या वजनाचा असतो त्याला मागणीही मोठी आहे. त्याचबरोबर कालवे, जिताडा, शिंपले पालन यांचेही प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिताडा हा मासा रायगड जिह्यात मोठय़ाप्रमाणात मिळतो. चविष्ट आणि तितकेच आर्थिकदृष्टय़ा महत्वाच्या असलेल्या या माशाला मागणीही मोठी आहे. त्यामुळे या माशाचे बीज येथे आणून त्याचेही उत्पादन जिह्यात घेण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

या योजनेंतर्गत या गावात व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये राबवण्यात येणाऱयाला सामूहिक प्रकल्पांसाठी 90 टक्के, तर वैयक्तिकसाठी तब्बल 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. याचबरोबर सामूहिक, शासकीय कांदळवनावर अवलंबून असलेल्या व्यक्तीसाठी शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन, पर्यावरणपूरक उपजीविकेचा विकास, निसर्ग-पर्यटन, कौशल्य विकास व इतर बाबींना संयुक्त वन व्यवस्थापनाची तत्वे सांभाळून, सामूहिक स्वरूपात चालना देण्याची शासनाची ही योजना आहे. यामध्ये कांदळवन क्षेत्रात कालवे, खेकडे, मधुमक्षिका पालन, मासेमारीपूरक योजना राबवणे, पिंजऱयातून मत्स्यपालन, शोभिवंत मत्स्यशेती, खेकडा उबवणी केंद्रे उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजनेंतर्गत करावयाची कामे

कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या गावातील कांदळवन क्षेत्रावर पुनःउत्पादनाची कामे हाती घेण्यात येत आहे. त्यातून पर्यायी रोजगारांची संधी वाढवण्यासाठी गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगाराविषयी प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने समिती बैठका आणि नियोजन सुरू असल्याचे विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

Related posts: