|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महाराट्र एकीकरण समितीतर्फे आजपासून मतदार जागृती अभियान

महाराट्र एकीकरण समितीतर्फे आजपासून मतदार जागृती अभियान 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विभागातील मराठी मतदारांना ऐन मतदानाच्यावेळी आपली नावे मतदार यादीतून गायब होण्याचा अनुभव नवीन नाही. मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करून घेण्याबाबतच मतदानविषयक कर्तव्याविषयी मतदारांनी जागृत होणे गरजेचे आहे. याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रविवार दि. 18 पासून मतदार जागृती अभियान हाती घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता लोकमान्य ग्रंथालय खानापूर रोड, टिळकवाडी येथून हे अभियान सुरू होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने पूर्वतयारी करून प्रशासनाने मतदार याद्या तयार केल्या आहेत. मात्र पूर्वानुभव लक्षात घेता मराठी मतदारांच्या नावांचा घोळ करण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतो. यासाठी मतदारांनी आपण स्वयंस्फूर्तीने जागरूक होऊन स्वतःची खातरजमा करून घेणे तसेच यादीत नाव नसल्यास त्यासाठी आवश्यक प्रक्रिया करून पुरवणी यादीत आपले नाव समाविष्ट करून घेणेही गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी इतरांनाही जागरूक करावे, असा या अभियानामागील उद्देश आहे.

या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि अभियान यशस्वी करावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. तसेच रविवार दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य ग्रंथालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.