|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार

प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार 

प्रतिनिधी/ सातारा

प्लास्टिक पर्यावरणाची हानी करते. हेच ओळखून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिह्यातील 1495 गावांमध्ये प्लास्टिक गोळा करण्याची मोहिम आखली होती. आता तर राज्य शासनानेच प्लास्टिक बंदीचा आदेश दिल्याने त्यामध्ये आणखी भर पडली आहे. जिह्यात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छता विभागाने आराखडाही तयार केला आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी तशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे जिह्यात प्लास्टिक हद्दपार होणार ही काळय़ा दगडावरची रेघच ठरणार आहे.

कुजत नाही असे प्लास्टिक गावागावात पहायला मिळते. एवढेच नाही तर जंगलात, ओढय़ा, नदीपात्रामध्ये प्लास्टिक दिसू लागले आहे. त्यामुळे ही परिस्थिती भयंकर असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्लास्टिक गोळा करण्याची मोहिम आखली. या मोहिमेत गावागावात प्रबोधनपर फेऱया विद्यार्थ्यांनी काढल्या. गावातील प्लास्टिक गोळा करण्यात आले. हे प्लास्टिक नेण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या समोर पडला होता. त्यावरही मार्ग निघाला आहे. त्यातच आता नव्याने राज्य शासनानेच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवर ती कशी राबवता येईल याचा आराखडाच स्वच्छता विभागामार्फत करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मोठय़ा लोकसंख्येची गावे घेण्यात आली आहेत. त्या गावातील दुकानदारांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. ग्रामपंचयातीस प्लास्टिकचा वापर करताना आढळून आल्यास त्या दुकानदारावर कडक कारवाई केली जाणार आहे. यासह अनेक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 11 तालुक्यातील गटविकास अधिकाऱयांकरवी ग्रामसेवकांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये या सूचना देण्यात येणार आहेत.

प्लास्टिकचा वापर टाळावा

प्लास्टिक हे कुजले जात नाही. त्यामुळे त्याचा वापर टाळावा. सातारा जिह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात. त्यामुळे आपला जिल्हा प्लास्टिकमुक्त लवकरच होवू शकतो. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच गावागावात प्लास्टिक दिसणार नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

Related posts: