|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजापूरच्या तरुणाचा हलकीजवळ खून

विजापूरच्या तरुणाचा हलकीजवळ खून 

प्रतिनिधी/ बेळगाव

सौंदत्ती तालुक्मयातील हलकीजवळ विजापूर येथील एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. शनिवारी खुनाचा प्रकार उघडकीस आला असून खुनानंतर गुन्हेगारांनी त्याची कार पळविली आहे.

प्रवीण खुबासिंग नायक (वय 29, रा. गणितांडा, ता. बसवंतबागेवाडी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी हलकीजवळील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील आधारकार्ड व काही कुटुंबीयांच्या मोबाईल क्रमांकामुळे त्याची ओळख पटविण्यात आली.

प्रवीणची स्वतःची कार आहे. तो कार भाडय़ाने देत होता. 13 मार्च रोजी काही जणांनी गोव्याला जाण्यासाठी त्याची कार ठरविली. भाडे घेवून प्रवीण केए 22 बी 4176 क्रमांकाच्या कारमधून गोव्याला गेला होता. गोव्यात असताना त्याने आपल्या पत्नीशी संपर्क साधला होता. गोव्याहून विजापूरला जाताना आपण यरगट्टीजवळ आहोत, असे त्याने आपल्या पत्नीला निरोप दिला होता.

त्यानंतर कुटुंबीयांबरोबरचा त्याचा संपर्क तुटला होता. हलकीजवळील यरझरवी क्रॉसजवळ असलेल्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. मुरगोड पोलिसांनी मृतेदह ताब्यात घेतला. डोक्मयावर दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खुनाचा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी विजापूर येथील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून यासंबंधी माहिती दिली.

उत्तरीय तपासणीनंतर शनिवारी प्रवीणचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला आहे. मुरगोड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पुणेकर पुढील तपास करीत आहेत. प्रवीणच्या खुनानंतर गुन्हेगारांनी त्याची कार पळविली आहे. कार पळविण्यासाठी त्याचा खून झाला की या मागे आणखी कोणती कारणे आहेत? याचा शोध घेण्यात येत आहे.