|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

विचार बदला नशिब बदलेलं (दुसरा भाग)

बुध. दि. 21 ते 27 मार्च 2018

एखादा माणूस स्वकष्टाने प्रगतीपथावर असेल तर लोकांना पोटदुखी सुरू होते व करणीबाधा करून त्याचा व्यवसाय बंद पाडायचा त्याच्यावर मारण प्रयोग करायचा. त्याच्या कोणत्याही कामात त्याला यश मिळू द्यायचे नाही, अशी कृष्णकृत्ये सुरू करतात. पण त्या व्यक्तीची पुण्याई अथवा दैव जोरदार असेल तर ती करणी ज्याने केली त्याच्यावर दुप्पट वेगाने आदळते व करणी करणाऱयाचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होते. दत्त संप्रदायातील उच्च अध्यात्मिक पातळी असलेल्या श्री टेंबे स्वामींच्यावर एका मांत्रिकाने करणी केली पण ती त्यांना न लागता त्या मांत्रिकावरच उलटली व तो तडफडू लागला. लोकांनी त्याला टेंबे स्वामीकडे  जाण्यास सांगितले त्याने त्यांची माफी मागितली व करणी उलटण्याचे कारण विचारले. ज्यावेळी टेंबे स्वामींनी सांगितले जी व्यक्ती आध्यात्मिक मार्गात असते तिचा रक्षणवार्ता परमेश्वर असतो जे कराल ते भराल हा त्याचा नियम आहे. एकवेळ परमेश्वर माफ करील पण तुमचे कर्म कधीही माफ करणार नाही. देवाने कर्माची किल्ली तुम्हाला दिली आहे व मास्टर किल्ली स्वत:कडे ठेवलेली आहे. ज्यावेळी अथक प्रयत्न करूनही यश मिळत नाही. हॉस्पिटलात जावूनही रोग बरे होत नाहीत. भयानक अपघातात माणसे मृत्यूमुखी पडतात. त्यावेळी तो परमेश्वरी शक्तीचा न्याय असतो. तेथे भ्रष्टाचार चालत नाही. हजारो तीर्थयात्रा केल्या, देवस्थानांना देणग्या दिल्या , शांती पूजा,पाठ केले तरी कर्माचे फळ चुकत नाही. तुमचे कर्म चांगले असेल तर पूजा पाठ,देवधर्म, शांती वगैरे काहीही न करता देखील सर्व इच्छा आपोआप पूर्ण होत असतात व जे सतत लोकांचे वाईट चिंतत असतात त्यांना आज ना उद्या त्याचे फळ भोगावेच लागते. प्रेतबाधा, भूतबाधा पिशाच्च बाधा का होतात तर जिवंतपणी या लोकांनी अनेकांचे वाईट केलेले असते. लोकांच्या इस्टेटी हडपलेल्या असतात. दुसऱयांच्या स्त्रीवर नजर ठेवलेली असते मी श्रीमंत आहे हाती सत्ता आहे. माझे वाईट कोण करणार अशा गुर्मीत काहीजण असतात. जोपर्यंत पुण्याई आहे तोपर्यंत सर्व व्यवस्थित चालते व पापाचे घडे भरताच ज्याची दृश्य फळे स्वत:ला अथवा त्याच्या कुटुंबियांना व पुढील पिढीला भोगावी लागतात. यासाठीच विचार व आचर या स्वच्छ ठेवा. स्वप्नात सुद्धा कुणाचे वाईट करू नका, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया ताबडतोब उमटते. ज्यावेळी एखाद्यावर करणी कराल अथवा त्याचे अनिष्ट चिंतन कराल त्याचक्षणी अधोगती सुरू होते व ग्रहदशा फिरताच त्याचा हिशोब चुकता करावा लागतो. एकाचवेळी जगात हजारो, लाखो मुले जन्माला येतात. त्यावेळेची कुंडली एकच असते पण पूर्वजन्मातील अथवा घराण्याच्या कर्मानुसार त्या बालकाचे भवितव्य घडत असते हे लक्षात ठेवावे.

मेष

चंद्र, शुक्र, हर्षल युतीमुळे आधुनिकता व फॅशनकडे ओढा राहील. कोणतेही विचार स्थिर राहणार नाहीत. गुरु कृपा आहे. त्यामुळे प्रवास, भागीदारी, कोर्टप्रकरणे, याबाबतीत यशस्वी व्हाल. रवी, बुध व्ययस्थानी असल्याने विसरभोळेपणामुळे महत्त्वाच्या वस्तू हरवतील. अथवा एखादे काम राहून जाईल. शनि, मंगळ युती अपघातदर्शक आहे. काळजी घ्या.


वृषभ

शुक्र, हर्षलचा योग चांगला नाही. नको त्या प्रकरणात गुंताल व ते निस्तरताना नाकी नव येतील. प्रेम प्रकरणात पडू नका. जीवन उदध्वस्त होईल. मंगळ, शनि युती धोकादायक आहे. सर्व बाबतीत जपून रहा. रवि, बुधाचे भ्रमण अनेक बाबतीत लाभदायक पण मित्र मैत्रिणींच्या कारवायामुळे ऐनवेळी  काही तरी घोटाळा होईल. प्रसंगावधान राखा.


मिथुन

शुक्र, हर्षल लाभात हा एक चांगला योग आहे. अचानक धनलाभ तसेच भेटवस्तू वगैरे दृष्टीने शुभयोग. रवि, बुध दशमात असल्याने महत्त्वाची जबाबदारी पडेल. पण ती पूर्ण कराल, असे नाही. धनस्थानी राहू  आर्थिक स्थितीला खिंडार पडेल. अनावश्यक  खर्चावर नियंत्रण ठेवा. नियोजन व कार्यक्षमता योग्य ठेवल्यास मोठे यश.


कर्क

चंद्र, राहू योगामुळे नको त्या बाधिक ठिकाणी जाण्याचा प्रसंग येईल. मंत्र तंत्र करणीबाधा करणारे यांच्यापासून सावध रहा. मंगळ, शनि युती आरोग्याच्या तक्रारी निर्माण करील. रवि, बुधाचे भाग्यातील भ्रमण कुटुंबात शुभ कार्य घडवील. गुरु, शुक्राचा प्रतियोग रहात्या वास्तु संदर्भातील समस्या सोडवील. नोकरी व्यवसायात उत्साही वातावरण.


सिंह

 राशिस्वामी रवि अष्टमात असल्याने महत्त्वाची कामे वेळेत होणार नाहीत. गंभीर आजारी रुग्णाजवळ फारवेळ थांबू नका. गुरु, शुक्राचा प्रतियोग लिखाण, प्रवास व धार्मिक कामात चांगले यश मिळवून देईल. शनि मंगळ युती पंचमात आहे. अघोरी व्यक्ती व अघोरी शक्ती यांच्यापासून स्वत:चा बचाव करा. राहूचा प्रभाव असल्याने काही पूर्वाजित दोष जागृत होतील.


कन्या

राशिस्वामी बुध सप्तमात आहे. जे कराल ते पूर्ण विचारांती करा. शनि, मंगळ युतीमुळे प्रत्येक कामात अडथळे येतात. वाहन व वास्तू अपघातापासून जपा. जे जमत नाही ते करण्याचा अट्टाहास करू नका. शुक्र, गुरु प्रतियोग सुखसमृद्धी आर्थिक हातभार, नवी नोकरी व्यवसाय, या बाबतीत चांगली फळे देईल. मानसिक शांती मात्र राहणार नाही.


तुळ

रवि, बुधाचे भ्रमण वैचारिक गोंधळ निर्माण करील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुरु, शुक्राचा प्रतियोग अध्यात्म देवधर्म परदेश प्रवास, तसेच महत्त्वाचे व्यवहार यात उत्तम यश देईल. शनि, मंगळ युती भावंडांशी मतभेद व अपघाताच्या दृष्टीने त्रासदायक आहे. शेजारी व नातेवाईकांच्या कोणत्याही ठेवून घेवू नका. अथवा ज्यांच्याकडे ठेवू नका, काहीतरी गडबड होईल.


वृश्चिक

राशिस्वामी मंगळ हा शनिने युक्त आहे. आर्थिक बाबतीत काटकसरीने वागा अनावश्यक फालतु वस्तू खरेदी करू नका. उजव्या डोळय़ाची काळजी घ्या. रवि, बुधाचे भ्रमण मुलाबाळांच्या बाबतीत शुभ आहे. गुरु, शुक्राचा प्रतियोग तुमच्या कार्य कर्तृत्वाला प्रोत्साहन देईल. शुक्र, हर्षल युती पैशासाठी वाटेल ते करण्यास भाग पाडील. सावध राहणे आवश्यक.


धनु

शुक्र, हर्षल युती प्रेमप्रकरणे निर्माण करील. तरुण तरुणींना सावधानता न बाळगल्यास पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक स्थितीत जरा फरक जाणवेल. गुरु, शुक्र प्रतियोगामुळे अत्यंत महत्त्वाची आर्थिक कामे सहज पूर्ण होतील. बुधाचे चतुर्थातील भ्रमण कागदोपत्री चुकीच्या सहय़ा अथवा चुकामुळे नव्या समस्या निर्माण करील.


मकर

गुरु, शुक्राचे भ्रमण अनेक सह त्याची कामे पूर्ण करण्यास सहाय्यक ठरेल. राशिस्वामी शनि, मंगळाने युक्त आहे.त्यामुळे खर्च वाढतील. किरकोळ अपघात, दुखापती यापासून जपावे. या काळात कुणालाही कोणत्याही बाबतीत शब्द देवू नका. जी कामे इतरांना जमणार नाहीत ती मात्र पूर्ण करू शकाल. धाडस वाढेल. नवीन काही तरी करून दाखवाल. पण जामिनकीपासून दूर रहा.


कुंभ

एखाद्याचे अन्न ते दुसऱयाचे विष असते तर त्याचे अशुभत्व दुसऱयाला कल्याणकारी असते. याचा अनुभव येईल. शनि, मंगळ लाभात असल्याने एखादा मोठा व्यवसाय सुरू करू शकाल. पण तो बंद पडलेला असेल तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. गुरुशुक्राचा शुभयोग दैवी कृपा लाभून देईल. मनातील सुप्त महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. धनस्य बुध रवि आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी प्राप्त करून देतील.


मीन

दूषित बुध तुमच्या राशीत आहे. त्यामुळे आचार विचारात एकता राहणार नाहीत. कागदोपत्री व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. गुरु, शुक्राचा प्रतियोग आर्थिक प्रगती व उद्योग व्यवसायाच्याबाबतीत अनुकूल आहे. मंगळ, शनि दशमात आहेत. वरि÷ांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करा. कुणी काही सांगितले तरी व्यवसाय अथवा नोकरी बदलू नका. तसेच घरातील अडचणी अथवा गुप्त बाबी तिऱहाईतासमोर सांगू नका.

Related posts: