|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलीस पेट्रोलपंपावरील चोरीतील फिर्यादी पोलिसाची आत्महत्या

पोलीस पेट्रोलपंपावरील चोरीतील फिर्यादी पोलिसाची आत्महत्या 

प्रतिनिधी/सोलापूर

शहरातील अशोक चौकातील पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या पेट्रोलपंपावरुन पाच लाखांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, यातील फिर्यादी सहाय्यक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय56) यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  पेट्रोलपंपावरील लुटीप्रकरणी पंपावरील सीसीटिव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून घटनेच्यावेळी कोणीही अज्ञात व्यक्ती आले नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याघटनेतील फिर्यादी असलेल्या राजमानेंची चौकशी करण्यात आली होती. यातच राजमाने यांनी विसंगत उत्तरे दिल्यामुळे संशयाची सुई त्यांच्या भोवतीच फिरत होती. याच दरम्यान  राजमाने यांनी आत्महत्या केल्यामुळे या घटनेला वेगळेच वळण लागले आहे.

रविवारी रात्री 11 च्या सुमारास राजमाने यांनी पंपावरील जमा रक्कम पाच लाख रूपये घेवून जात असताना सहा दरोडेखोरांनी डोळ्यात चटणी टाकून पैसे पळविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. घटना आणि फिर्यादीची साक्ष यात तफावत आढळत असल्याने संशयाची सुई राजमाने यांच्यावरच होती. त्या अनुषंगाने तपास करताना राजमाने यांच्या घरात दोन लाख रूपये मिळाले होते. एवढे पैसे कुठून आले याबाबत चौकशी करण्यात येत होती.

दरम्यान याप्रकरणी संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली. याच तणावातून राजमाने यांनी बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडले. जाताना त्यांनी स्वतःचा मोबाईल घरातच ठेवून वॉकिंगला जातो असे पत्नी रत्नमाला यांना सांगून निघाले. त्यानंतर राजमाने यांनी दुचाकीवरुन शेळगी येथील पुलावर गेले. तेथून जुना तुळजापूर नाका येथील रूपाभवानी मंदिर समोरील पुलावर आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. घरातून आणलेली दोरी पुलाच्या लोखंडी अँगलला बांधून त्यांनी गळफास घेतला. पहाटेच्या सुमारास पुलाखाली वॉकिंगला येणाऱया लोकांनी घटना पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. ऐन रस्त्यावरच गळफास घेतल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजय पवार, दुय्यम पोलीस निरीक्षक बहीरट यांनी घटनास्थळी दाव घेवून माहिती घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

 राजमाने यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदानानंतर मूळ गावी मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

          खऱया आरोपींना शिक्षा व्हावी : रत्नमाला राजमाने

तपास योग्य रितीने होत नाही. माझ्यावर दबाव आणून चौकशी केली जात आहे. यात माझा काहीच दोष नाही, असे मारुती राजमाने यांनी आदल्या दिवशी सांगितल्याचे पत्नी रत्नमाला यांनी सांगितले. या लुटीचा छडा लवकरात लवकर लागावा आणि खऱया आरोपीला शिक्षा करावी अशी मागणी रत्नमाला राजमाने यांनी केली.

Related posts: