|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्जबाजारी शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या 

प्रतिनिधी/बेळगाव

कर्जबाजारी शेतकऱयाने आपल्याच शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी होन्नीहाळ (ता. बेळगाव) येथे घडली. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शेतकऱयाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रुद्रय्या मडिवाळय्या मठद (वय 44) असे त्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रुद्रय्या आपल्या पत्नीसमवेत जनावरांचा गोठा साफ करण्यासाठी व दूध काढण्यासाठी शेतात गेला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, पाच भाऊ असा परिवार आहे.

रुद्रय्याने शेतीसाठी वेगवेगळय़ा बँकांतून कर्ज काढले होते. शेतात उसाची लागवड केली होती. पाण्याअभावी ऊस पीक वाळले आहे. पिकांना पाणी पाजण्यासाठी आणलेली 10 हजार लिटर पाण्याची टाकी फुटली आहे. याबरोबरच दोन जनावरेही दगावली. एका पाठोपाठ एक आलेल्या संकटांच्या मालिकेमुळे रुद्रय्या त्रासला होता.

कर्जाचा भरणा कसा करायचा? याची चिंता त्याला लागून राहिली होती. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 8 वाजता जनावरांचा गोठा साफ करून दूध काढण्यासाठी रुद्रय्या आपल्या पत्नीसमवेत शेतात गेला होता. दूध काढल्यानंतर पत्नी घरी परतली. तो शेतातच होता. सकाळी 9 वाजता रुद्रय्याने शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

साडेचार लाख रुपये कर्ज काढल्याची माहिती

हा प्रकार उघडकीस येताच मारिहाळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी रुद्रय्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. दुपारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुद्रय्याने सुमारे साडेचार लाख रुपये कर्ज काढल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts: